G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411
ताज्या घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ताज्या घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नळदुर्गच्या श्री खंडोबा देवाची यात्रा २ जानेवारीपासून...


 नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग (मैलारपूर) येथील जागृत देवस्थान श्री खंडोबा देवाचा यात्रोत्सव २ ते ४ जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात आणि उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याने नळदुर्ग परिसर सुवर्णमयी होण्यासाठी सज्ज झाला असून, या यात्रेसाठी सुमारे ५ ते ७ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

धार्मिक महत्त्व आणि परंपरा

श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून महाराष्ट्रातील खंडोबाच्या एकूण १२ स्थानांपैकी नळदुर्गचे मैलारपूर हे दुसरे प्रमुख स्थान मानले जाते. विशेष म्हणजे श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह याच पवित्र ठिकाणी झाला, अशी आख्यायिका आहे. मागील दीड महिन्यांपासून येथे यात्रोत्सव सुरू असून,  पौष पौर्णिमेच्या यात्रेने या उत्सवाची सांगता होणार आहे.

३ जानेवारीला यात्रेचा मुख्य दिवस

यात्रेचा मुख्य दिवस शनिवार , ३ जानेवारी रोजी असणार आहे. या दिवशी पहाटे देवाचा अभिषेक आणि महापूजा संपन्न होईल. दिवसभर भाविकांचे नवस फेडण्याचे कार्यक्रम, तसेच पारंपरिक वाघ्या-मुरळी नृत्य सादर केले जातील. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध गावांमधून येणाऱ्या जवळपास सातशे नंदीध्वज (काठ्या).

मध्यरात्रीचा नयनरम्य सोहळा

३ जानेवारीच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्ग येथील मानाच्या काठ्यांचे आगमन मंदिरात होईल. यावेळी होणारी आतषबाजी आणि शोभेच्या दारूचे काम पाहण्यासारखे असते. दोन्ही गावांच्या मानकऱ्यांचा  सत्कार आणि वाजतगाजत निघणारा छबिना याने यात्रेची सांगता होईल. भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेले भक्तगण हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असते.

प्रशासकीय सज्जता

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थांनकडून दर्शन बारीची (रांग) व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा यशस्वी आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मंदिर समिती, यात्रा कमिटी आणि नळदुर्ग नगरपरिषद अहोरात्र मेहनत घेत आहेत.

 

अणदूर येथील श्री खंडोबा यात्रा २१ नोव्हेंबरला; 'गावे दोन, मंदिर दोन, देव एक' अशी अनोखी परंपरा

 २२ नोव्हेंबर रोजी श्री खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान; देवस्थान समितीकडून जय्यत तयारी



तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा देवाची प्रसिद्ध यात्रा येत्या २१ नोव्हेंबर रोजी भरणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्री खंडोबा देवस्थान समिती आणि यात्रा कमिटीने यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी अणदूर येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील. यामध्ये श्री खंडोबाची महापूजा आणि रात्री छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे.


या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'गावे दोन, मंदिर दोन आणि देव एक' ही अनोखी परंपरा. श्री खंडोबाच्या मूर्तीचे वास्तव्य अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग) येथील मंदिरात पावणे दोन महिने असते. या परंपरेनुसार, यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २२ नोव्हेंबर रोजी, श्री खंडोबाचे आगमन मैलारपूर (नळदुर्ग) येथील मंदिरात होणार आहे.


देवाच्या मूर्तीचे स्थलांतर करण्यापूर्वी अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही गावांतील मानकरी मंडळींमध्ये रीतसर लेखी करार केला जातो. त्यानंतरच देवाच्या मूर्तीला पालखीमध्ये विराजमान करून वाजत गाजत नळदुर्गकडे नेले जाते.


मैलारपूर (नळदुर्ग)  हे स्थळ श्री खंडोबा आणि बाणाई यांचे विवाह स्थळ म्हणून ओळखले जाते. येथील मंदिरात चंपाषष्टी यात्रा आणि पौष पौर्णिमा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या दोन्ही यात्रा उत्सवांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात.

अणदूरच्या श्री खंडोबाचे सिंहासन चांदीचे होणार

नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी दीड महिन्यात काम पूर्ण करणार 


अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबाचे सिंहासन बदलण्यात आले असून, हे सिंहासन चांदीचे करण्यात येत आहे. त्यासाठी ३५ किलो चांदी लागणार असून २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. 


श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे अणदूर येथील श्री खंडोबा तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. या खंडोबाच्या दर्शनासाठी  संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधील भाविक दररोज येत असतात. हे मंदिर पुरातन असून साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. 


या मंदिरातील पुरातन सिंहासन पितळी होते, त्याची काही प्रमाणात झीज झाल्याने ते काढून सागवानमध्ये सिंहासन तयार करण्यात आले आहे. त्यावर आता चांदीने बसवण्यात  येणार असून , सुंदर नक्षीकाम देखील करण्यात येणार आहे. या कामासाठी ३५ किलो चांदी लागणार असून २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. दीड महिन्यात हे  काम पूर्ण करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 




 परेश कुलकर्णी यांना सोमवारी या कामाचे कंत्राट देण्यात आले , यावेळी  मंदिर समितीच्या वतीने उपाध्यक्ष अविनाश मोकाशे यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा सत्कार करणात आला. यावेळी अध्यक्ष बालाजी मोकाशे, सचिव सुनील ढेपे, सदस्य दीपक मोकाशे, बाळू येळकोटे, महादेव खापरे आदी उपस्थित होते. 



ज्या भाविकांना या पुण्यकामास आर्थिक मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी श्री खंडोबा देवस्थान,एसबीआय  बँक खाते नंबर - 11507329802  IFS Code SBIN0003404 यावर रक्कम जमा करावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने सचिव सुनील ढेपे यांनी केले आहे.  




श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे

सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड 




अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर - नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे, उपाध्यक्षपदी अविनाश मोकाशे यांची नव्याने तर सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. 

अणदूर - नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री  खंडोबा हे जागृत देवस्थान असून, श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे राज्यात प्रसिद्ध आहे.  श्री खंडोबाच्या दर्शनासाठी  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश . तेलंगणा येथील हजारो भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. 

१० वर्षानंतर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी बदलेले आहेत. सचिव सुनील ढेपे वगळता अन्य आठ सदस्य नवीन घेण्यात आले आहेत. मावळते अध्यक्ष प्रकाश मोकाशे यांनी नव्या पदाधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवला. 

नवीन पदाधिकारी असे : अध्यक्ष -  बालाजी  सुधाकर मोकाशे , उपाध्यक्ष  - अविनाश दिलीप मोकाशे , सचिव  - सुनील मधुकर ढेपे 

सदस्य -  महेश विठ्ठल  मोकाशे,  शशिकांत यादव मोकाशे , दिपक अशोक मोकाशे ,महादेव गंगाधर मोकाशे , अमोल रमेश मोकाशे , सदानंद खंडेराव येळकोटे. 


स्वर्गाची सुंदरी, नवरी नटली नंतर राहुल शिंदेचं आलं अणदूर - नळदुर्गच्या खंडोबावर लोकप्रिय गाणं




उस्मानाबाद  - स्वर्गाची सुंदरी, नवरी नटली , पुण्याचा राघू आदी लोकप्रिय गाणे गाणाऱ्या गायक राहुल शिंदे यांचं  खंडोबावर नवीन दमदार गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्गच्या  श्री खंडोबा आख्यायिकेवर पत्रकार सुनील ढेपे यांनी  हे गाणं लिहिले आहे. 

अणदूर आणि नळदुर्ग हे दोन वेगवेगळे गावे असली तरी श्री खंडोबाची मूर्ती एकच आहे. अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने श्री खंडोबाचे वास्तव असते. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह याच ठिकाणी झाला आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राला अनन्य साधारण महत्व आहे. 

याच खंडोबा आख्यायिकेवर पत्रकार सुनील ढेपे यांनी 'बघा माझा खंडोबा कसा डोलतो' हे  भक्तीगीत लिहिले असून, गायक राहुल शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात हे गायलं आहे.सहगायक म्हणून शाहीर बापु पवार आणि सचिन अवघडे यांनी भाग घेतला आहे. उस्मानाबाद लाइव्ह आणि मुक्तरंग म्युझिक चॅनलने हे गाणं रिलीज केले आहे. 

अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा ५ डिसेंबर रोजी आहे. त्यानंतर श्री खंडोबाचे नळदुर्गमध्ये आगमन होते, त्यानंतर दर रविवारी यात्रा तर पौष पौर्णिमेला महायात्रा भरते , दर रविवारच्या यात्रेला किमान २० ते ३० हजार भाविक आणि महायात्रेला ५ लाख भाविक येत असतात. कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा झाली नसली तरी यंदा यात्रा नेहमीप्रमाणे भरण्याची शक्यता आहे. 

युट्युब लिंक 



अणदूर - नळदुर्गचे खंडोबा मंदिर दर रविवारी बंद




अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर - नळदुर्गचे श्री खंडोबा  मंदिर यापुढे  दर रविवारी बंद राहणार आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी पुढील आदेश येईपर्यंत रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन  मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 


कोरोना रुग्णाची संख्या वाढल्यामुळे  उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच दर रविवारी मंदिरे आणि  प्रार्थनास्थळेही  बंद राहणार आहेत, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अणदूर - नळदुर्गचे  श्री खंडोबा मंदिर दर रविवारी बंद  ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. 


अणदूर - नळदुर्गचे श्री खंडोबा मंदिर  जागृत देवस्थान असल्याने दर रविवारी दोन्ही ठिकाणी भाविकांची  मोठी गर्दी असते. भाविकांनी यापुढे पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी केले आहे. 

कोरोनाचा फटका : नळदुर्गच्या श्री खंडोबाची महायात्रा रद्द




नळदुर्ग : अणदूर पाठोपाठ नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेला कोरोना महामारीचा फटका बसला आहे. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणारी महायात्रा रद्द करण्यात आली आहे. या तिन्ही दिवशी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार  आहे, मात्र प्रमुख मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. 


 मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा असंख्य लोकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून किमान पाच ते सात लाख भाविक यात्रेसाठी हजेरी लावत असतात. श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळ असल्यामुळे आणि जवळच भुईकोट किल्ला असल्यामुळे यात्रेला मोठी गर्दी असते. 


यंदाची यात्रा दि. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणार होती. २८ जानेवारी रोजी छबिना निघणार होता. २९ जानेवारी रोजी कुस्तीचा फड रंगणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे तसेच कुस्त्या होणार नाहीत. आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच यात्रा रद्द करण्यात आली आहे. 


२७ ते २९ जानेवारी दरम्यान   मैलारपूर  मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तसेच व्यवसायीकांना दुकान लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. याबाबत रविवारी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत नियमावली वाचून दाखवण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी , आरोग्य विभाग, नगर पालिका कर्मचारी, मानकरी, पुजारी, लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 


धार्मिक विधी पार पडणार 


कोरोना महामारीमुळे महायात्रा रद्द करण्यात आली असली तरी सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.  २७ ते  २९ जानेवारी हे तीन मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.नळदुर्ग व अणदुरच्या प्रत्येकी पंचवीस मानक-यांना या काळात पारंपरिक विधी करण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी मैलारपूर मंदिराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. बाहेर गावच्या भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे,  असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read More

https://osmanabadlive.com/breaking-news/coronas-blow-shri-khandobas-mahayatra-of-naldurg-canceled/cid2080221.htm

कोरोनाचा फटका : अणदूरच्या श्री खंडोबा यात्रेवर बंदी

प्रथेप्रमाणे ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये मूर्ती नळदुर्गला जाणार 






अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा यात्रेला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे.  १५ डिसेंबर रोजी होणारी यात्रा  रद्द करण्यात आली आहे. मात्र प्रथेप्रमाणे श्री खंडोबाची मूर्ती ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये  नळदुर्गला नेण्यात येणार आहे. 


अणदूर आणि नळदुर्ग मध्ये श्री खंडोबाचे दोन वेगवेगळे मंदिर असून, श्री खंडोबाची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते.गेल्या सातशे वर्षापासून ही रूढी - परंपरा सुरु आहे. अणदूरची यात्रा झाली मूर्ती नळदुर्गला नेली जाते. यंदा १५ डिसेंबर रोजी अणदूरची यात्रा होती. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अणदूरची  यात्रा रद्द करण्यात आली आहे. अणदूर आणि नळदुर्गचे  प्रमुख मानकरी, विश्वस्त मंडळ, पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये लेखी करार करून मूर्ती नळदुर्गला नेण्यात येणार आहे, मात्र यात्रा होणार नाही., असे प्रशासनाने कळविले आहे. 


मंदिर परिसरात प्रासादिक भांडार दुकाने लावण्यास तसेच  हॉटेल, खेळणी दुकाने , पाळणे लावण्यास बंदी  घालण्यात आली आहे. यादिवशी भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 


नळदुर्गच्या मंदिराची रंगरंगोटी सुरु 


श्री खंडोबाचे १६ डिसेंबर रोजी पहाटे नळदुर्गच्या  श्री खंडोबा मंदिरात  आगमन होणार आहे. या मंदिराची सध्या  रंगरंगोटी सुरु असून त्याचे काम अंतिम टप्पात आहे. 


श्री खंडोबाचे अणदूरहुन नळदुर्गमध्ये आगमन

नळदुर्ग: अणदूरची यात्रा पार पडल्यानंतर  श्री खंडोबाच्या मूर्तीचे अणदूर येथील मंदिरातून नळदुर्ग (मैलारपूर) येथील मंदिरात गुरुवारी (ता.28) पहाटे चार वाजता वाजत-गाजत पालखीतून आगमन झाले. यावेळी मूर्ती देवाणघेवाणीबाबत नळदुर्गचे मानकरी व अणदूरचे मानकरी यांच्यामध्ये पूर्वापार चालत आलेला लेखी करार झाला. नळदुर्गकरांनी मैलारपूर मंदिर मार्गावर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या.

अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही गावात चार किलोमीटर अंतर आहे. या दोन्ही गावात श्री खंडोबाची मंदिरे असली तरी मूर्ती मात्र एकच आहे. श्री खंडोबाची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते. अणदूरहुन नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात मूर्ती नेण्या - आणण्याचा लेखी करार केला जातो. राज्यातील नव्हे देशातील हे एकमेव उदाहरण आहे.

मानकऱ्यांमध्ये लेखी करार
श्री खंडोबा व बाणाईचा विवाह नळदुर्ग येथे झाल्याची आख्यायिका असल्यामुळे नळदुर्ग (मैलारपूर) हे खंडोबाच्या भाविकांसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे.  अणदूर येथील यात्रा बुधवारी (ता. 27) मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली. बुधवारी रात्री छबिन्याची सांगता होऊन नळदुर्गच्या मानकऱ्यांचे आगमन झाले. अणदूर व नळदुर्ग या दोन्ही गावांच्या मानकऱ्यांमध्ये देवाची मूर्ती नेण्याचा, तसेच आणण्याचा लेखी करार करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मूर्ती नळदुर्गकडे मार्गस्थ झाल्या.

विधिवत पूजा करून मूर्तींची प्रतिष्ठापना
गुरुवारी पहाटे तीन वाजता श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीतून नळदुर्गकडे मार्गस्थ झाली. पहाटे पाच वाजता मैलारपूर-नळदुर्गमध्ये आगमन झाले. त्यानंतर विधिवत पूजा करून सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील पावणे  दोन महिने श्री खंडोबा मूर्ती मैलारपूर येथे वास्तव्यास असणार आहे. पौष पौर्णिमेस (10 व 11 जानेवारी) यात्रोत्सव साजरा होणार आहे. या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.


अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा २७ नोव्हेंबर रोजी

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा येत्या २७  नोव्हेंबर रोजी भरत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून यात्रेची जय्यत करण्‍यात येत आहे. 

अणदूरच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ .३० वाजता श्री खंडोबाची महापूजा होईल. दिवसभर भंडारा - खोबरे उधळणे, महानैवेद्य दाखवणे आदी कार्यक्रम पार पडतील. रात्री दहा वाजता श्रीचा छबीना - मिरवणुक काढण्यात येईल. रात्री १२ वाजता नळदुर्गच्या मानकर्यांचे आगमन, त्यानंतर मानपानाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अणदूर-मैलारपूर(नळदुर्ग) च्या मानकर्यांत खंडोबाची मूळ मूर्ती नेणे व आणण्याचा लेखी करार होईल. मध्यरात्री २.३० वाजता खंडोबाच्या मूर्तीच्या पालखीचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल. पहाटे ५ वाजता मैलारपूर (नळदुर्ग) मंदिरात खंडोबाचे आगमन नंतर विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.
 
अणदूरच्या यात्रेनिमित्त श्री. खंडोबाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. श्री खंडोबा मंदिर समिती व श्री खंडोबा यात्रा कमिटी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहे.
 
श्री खंडोबा आणि बाणाई विवाहस्थळ
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८  प्रमुख ठिकाणे आहेत, पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता म्हणून या स्थानाला अन्यन्यसाधारण महत्व आहे,  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार कि.मी. आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. अणदूरच्या यात्रेनंतर खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होणार आहे.
 
२८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा आखाडा
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा भव्य आखाडा भरणार आहे, या आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत पैलवान हजेरी लावणार असून, ११ हजार ते ५१ हजार बक्षिस ठेवण्यात आले आहे, त्याची जय्यत तयारी सुरु आहे, 
 
 

सुपरफास्ट युगातही कावडीने पाणी आणण्याची प्रथा कायम

अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रसिध्द देवस्थान श्री खंडोबास संपूर्ण श्रावण महिन्यात नळदुर्गच्या नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरीचे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे आणण्यात येते.सध्याच्या सुपरफास्ट युगात कावडीने पाणी आणण्याची ही प्रथा अजूनही कायम आहे.यंदाचा मान पुजारी अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आला आहे.


नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नळ आणि दमयंती हे राजा - राणी राहत होते.दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा आदीमैलारहून नळदुर्गात प्रकट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी बाणाईस चंदनपुरीहून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीस प्रस्थान केले,ही अख्यायिका प्रसिध्द आहे.नंतर नळ राजाने नळदुर्गजवळील बोरी नदीजवळ मंदिर बांधून श्री खंडोबाच्या स्वयंभू मुर्तीची प्रतिष्ठापणा केली.श्री खंडोबाची स्वयंभू मुर्ती नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरूजाजवळ सापडली आहे.

कालांतराने श्री खंडोबाचे मंदिर अणदूर येथे बांधण्यात आले.नंतर अणदूर आणि नळदुर्गच्या ग्रामस्थात करार होवून श्री खंडोबाची मुर्ती नेण्या आणण्याचा करार झाला.अणदूर आणि नळदुर्ग हे अंतर चार ते साडेचार किलोमीटर आहे.श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावने दोन महिने वास्तव्य असते.दोन्ही ठिकाणी स्वतंत्र मंदिरे असून,देव मात्र एकच आहे.

आगळी वेगळी प्रथा
श्री खंडोबाचे वर्षभर अनेक यात्रा उत्सव असतात.श्रावण महिन्यात एक आगळीवेगळी प्रथा आहे.श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे.श्री खंडोबाच्या मुर्तीखाली महादेवाची पिंड अस्तीत्वात आहे.या पिंडीस आणि श्री खंडोबाच्या मुर्तीस श्रावण महिन्यात नागझरीच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरी हे मैलारपूर (नळदुर्ग) मंदिराच्या जवळ डोंगर कपारीत आहे.तेथून हे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे भल्या पहाटे आणण्यात येते.

कुठे आहे नागझरी ?
मैलारपूर मंदिरापासून वसंतनगर जाणा-या रस्त्यावर कॅनॉलच्या दक्षिण बाजूस उंच
डोंगरावर नागझरी झरा आहे.या ठिकाणी एक कुंड आहे.या झ-याचे पाणी बारा महिने असते आणि विशेष म्हणजे ते गरम असते.गेली चार वर्षे उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ होता,परंतु या दुष्काळातही या झ-याचे पाणी वाहत होते.हे पाणी अत्यंत शुध्द आणि निर्मळ असून,ते गंगेचे पाणी असल्याची भाविकांची धारणा आहे.


 
असा असतो दिनक्रम
यंदाचा मान अणदूरच्या पुजारी समाजातील अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आलेला आहे.हे दोघे पाहटे तीन वाजता उठून अंघोळ करून धोतर (सोहळे)नेसून प्रत्येकी दोन घागरी (सोबत कावड) घेवून अनवाणी पायी (चप्पल न घालता) चालत निघतात.ते पहाटे चारपर्यंत नागझरीला पोहचतात.तेथे गेल्यानंतर परत अंघोळ करून प्रत्येकी दोन घागरी भरून कावडीने मैलारपूर मंदिरात जातात.तेथील मंदिरातील महादेवाच्या पिंडीस तांब्यातील पाणी घालून ते थेट अणदूरकडे प्रस्थान करतात.एकदा कावड उचलली की ती वाटेत कुठेही टेकावयाची नाही,असा नियम आहे.अणदूरच्या मंदिरात पहाटे साडेपाचपर्यंत ते पायी चालत पोहचतात.

मैलारपूर ते अणदूर हे अंतर चार किलोमीटर आहे.अंधा-या रात्री पावसाची तमा न बाळगता ही कावड आणली जाते.जाण्यायेण्याचे अंतर हे ९ किलोमीटर आहे.हे जिकरीचे काम अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे पार पाडत आहेत.कावडीने पाणी आणणे ही देवाची सेवा असून,ही सेवा करण्यात कसलेही कष्ट जाणवत नसल्याचे अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे सांगितले.
अणदूरच्या श्री खंडोबाची सकाळी ८ वाजता आणि रात्री ८ वाजता महापुजा होते.या दोन्ही वेळेस श्रावण महिन्यात श्री खंडोबाच्या मुर्तीस नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.इतरही महिन्यातही दोन वेळेस नित्यनियमाने पुजा होते,त्याचा मान माऊली मोकाशे यांना आहे.

खडी रविवार
श्रावण महिन्यात सर्व ठिकाणी सोमवारी उपवास केला जातो,परंतु अणदूरमध्ये रविवारी उपवास केला जातो आणि तो खडी उभा राहून केला जातो.श्री खंडोबाची सकाळी ९ वाजता पुजा आटोपली की,उपवास करणारे उभे राहतात,ते दिवसभर जेवण करत नाहीत,उभे राहूनच फराळ करतात.नंतर रात्रीची पुजा झाल्यानंतर प्रदक्षिणा संपल्यानंतर बसतात.तब्बल बारा तास उभे राहून हा उपवास केला जातो.यास खडी रविवार म्हटला जातो.किमान दीडशे ते दोनशे लोक खडी रविवारचा उपवास करतात.त्याचबरोबर रात्रीच्या पुजेच्या वेळी पुजारी समाजातील प्रत्येक घरातून एका व्यक्तीने सोहळ्यामध्ये येवून श्री खंडोबास पुजेच्या वेळी १०१ बेलपत्र घालण्याची प्रथा आहे.ही प्रथा आजही कायम आहे.

अनादी कालापासून प्रथा
अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी कावडीने आणण्याची प्रथा अनादी कालापासून सुरू आहे.ही प्रथा सध्याच्या सुपरफास्ट युगातही कायम ठेवण्यात आली आहे,असे श्री खंडोबा मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी सांगितले.

श्री खंडोबा कँलेडरचे थाटात प्रकाशन

नळदुर्ग - श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री खंडोबा कँलेडरचे प्रकाशन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील - दुधगावकर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी मंदिर समितीच्या कार्यालयात करण्यात आले.
श्री खंडोबा देवस्थानने यावर्षी प्रथमच श्री खंडोबाचे छायाचित्र आणि माहिती असलेले १५ बाय २० आकाराचे कँलेडर प्रसिध्द केले आहे.या कँलेडरचे प्रकाशन एका छोट्याच्या समारंभात करण्यात आले.यावेळी उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य,ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मोकाशे, उपाध्यक्ष दिलीप शिवराम मोकाशे, सचिव सुनील ढेपे, सदस्य अशोक मोकाशे, दिलीप गोविंदराव मोकाशे, मराठवाडा लाइव्हचे संपादक सुनील बनसोडे आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत सुधाकर ढेपे,प्रकाश ढोबळे,रमेश मोकाशे आदींनी केले.
यावेळी संजय पाटील - दुधगावकर आणि राजाभाऊ वैद्य यांचा शाल,श्रीफळ, खंडोबाचा फोटो देवून आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भाषणात सचिव सुनील ढेपे यांनी ट्रस्टने केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील यांनी यात्रेच्या दिवशी पाणी टंचाई भासू देणार नाही, तसेच मंदिराच्या विकास कामासाठी हातभार लावू,असे आश्वासन दिले.शेवटी उपस्थितांचे आभार अध्यक्ष प्रकाश मोकाशे यांनी मानले.

लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची यात्रा सुरळीत

नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडली.गेल्या तीन दिवसांत दहा लाखाहुन अधिक भाविकांनी रांगेत आणि शिस्तीत दर्शन घेतले. यात्रेनिमित्त श्री खंडोबाचा वाजत - गाजत छबिना काढण्यात आला तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
मैलारपूरचा श्री खंडोबा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. यात्रेसाठी किमान पाच लाख भाविक येत असतात.यंदा मात्र रेकॉर्ड ब्रेक यात्रा पार पडली. श्री खंडोबाची यात्रा पौष पोर्णिमेला पार पडत असते. यंदा रविवार व सोमवार सलग दोन दिवस पोर्णिमा आल्याने रविवारी पहाटे पासूनच भाविकांची मोठी रांग लागली. रविवार,सोमवार तसेच मंगळवार असे तीन दिवस सलग रांग चालू होती.
यात्रेसाठी श्री खंडोबा मंदिराचा भोवतालचा संपूर्ण माळराण भाविकांनी फुलून गेले होते. जिकडे - तिकडे वाहनांची तसेच माणसांची गर्दी दिसून आली.यात्रेसाठी विविध ठिकाणाहून सातशेहून अधिक नंदीध्वजाचे (काठ्यांचे )आगमन झाले होते.भाविकांना अंगोळीसाठी बोरी नदीच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.तसेच नदीच्या घाटावरही भाविकांनी अंगोळ करून, श्री खंडोबाचे दर्शन घेतले.तसेच काही भाविकांनी दंडवत घालत आपला नवस पुर्ण केला.भंडारा तसेच खोबरे उधळून येळकोट, येळकोट जयघोष केला. भाविकांनी उधळलेल्या भंडा-यामुळे मंदिर परिसर पिवळा झाला होता.भाविकही भंडा-यांने न्हाहून निघाले होते.
श्री खंडोबाला पुरण - पोळीचा नैवेद्य चालतो.भाविकांनी आपापल्या नेमूण दिलेल्या ठिकाणी चूल मांडून स्वयपाक केला तसेच नैवेद्य पण तयार करून श्री खंडोबा नैवैद्य दाखविला.तसेच श्रीफळ फोडून तसेच चांदीचे तसेच पितळ्याचे घोडे वाहून नवस पुर्ण केला.
दर्शनासाठी श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने दर्शन बारी तयार करण्यात आली होती.त्यामुळे भाविकांनी रांगेत तसेच शिस्तीस दर्शन घेतले.तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी मंदिर उजाळून निघाले होते.दर्शन झाल्यानंतर बच्चे कंपनीसाठी पाळणे, खेळणी तसेच करमणुकीचे साधने असल्यामुळे भाविकांनी त्याचा आनंद लुटला.
वाजत - गाजत छबिना
सोमवारी मध्यरात्री बारा वाजता नळदुर्गच्या मानाच्या नंदीध्वजाचे आगमन झाले.त्यानंतर अणदूरच्या श्री खंडोबा मंदिरातील दोन्ही घोड्याचे आगमन झाले. यावेळी शोभेचे दारूकाम करण्यात आले.त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता मंदिर ट्रस्टच्या वतीने अणदूर व नळदुर्ग मानक-यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर पहाटे तीन वाजता छबिन्यास प्रारंभ झाला. समोर दोन घोडे, पालखी आणि गावागावांतून आलेल्या काठ्या समवेत नदीकाळावरील मसोबा , जुने मंदिर मार्गे वाजत - गाजत छबिना काढण्यात आला.हलगीच्या तालावर नाचणारे वारू, विविद्य वाद्यात येळकोट, येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत श्री खंडोबाचा छबिना सकाळच्या सहा वाजण्याच्या सुमारास पार पडला.
यात्रा शांततेत पार पडण्यासाठी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व पुजारी मंडळाने सलग तीन दिवस परिश्रम घेतले.तसेच नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम केले.पोलीस निरीक्षक शेटगार यांनी सलग तीन दिवस जागे राहून काम केल्याने यात्रा शांततेत पार पडली.पोलीसासाठी श्री खंडोबा देवस्थानने जेवण्याची व राहण्याची व्यवस्था करून जिव्हाळा जपला.

श्री खंडोबाचे मुस्लीम भक्त

अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) च्या खंडोबाचे असंख्य हिंदू भक्त आहेत. खंडोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील अनेक भक्त वर्षातून एकदा तरी दर्शनासाठी येत असतात. पण त्यांचे कोणाला कौतुक वाटत नाही, कौतुक वाटते ते दोन मुस्लीम भक्तांचे. बाबूराव पिंजारी व याकुब शेख अशी त्यांची नावे. बाबूराव पिंजारी यांचे वय 70 च्या पुढे आहे. वयाच्या 30 वर्षापासून ते श्री खंडोबाच्या पुजेसाठी दररोज फुले देत आहेत. सध्या त्यांच्या डोळ्याला दिसत नाही, तरीही त्यांची सेवा कधी चुकलेली नाही.याकूब शेख हे यांचे वय 60 वर्षे असून गेल्या 35 वर्षापासून श्री खंडोबाचा नगारा वाजविण्याचे काम ते करतात. श्री खंडोबाची सकाळी व रात्री अशी दोन वेळा पुजा केली जाते, या दोन्ही वेळी नगारा वाजविण्याचे काम याकूब शेख नित्यनियमाने व चोखपणाने करतात.

देणा-याचे हात हजार...

चांगले काम केले की, लोक स्वत:हून मदत करतात,श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचा सचिव म्हणून काम करताना याचा अनुभव येत आहे.
अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट हा रिलीजस ट्रस्ट आहे. या ट्रस्टचे सभासद होण्याचा अधिकार फक्त श्री खंडोबाचे हक्कदार पुजा-यांनाच आहे.साधारण 1959 साल असावा. माझे आजोबा दत्तात्रय कोडींबा ढेपे, आप्पाराव तुळशीराम मोकाशे, बाबूराव यशवंत मोकाशे, माणिकराव सखाराम मोकाशे ही त्यावेळीची कर्ती मंडळी. त्यांनी खंडोबा देवस्थानच्या देखभालीसाठी ट्रस्ट स्थापन केला.घटना तयार करताना खरी मदत केली ती विशेष लेखा परिक्षक शंकरराव नाटेकर यांनी. नाटेकर हे अणदूरचे. ते गव्हरमेंटचे मराठवाड्यातील पाच जिल्ह्याचे विशेष लेखा परिक्षक होते.तेच श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी तयार केलेल्या घटनेमुळचे आज हा ट्रस्ट पुजा-यांच्या ताब्यात आहे.
पुर्वीच्या काळी ट्रस्टला कसलेही स्वउत्पन्न नव्हते.लाईटची व्यवस्था नव्हती.माझे आजोबा दत्तात्रय ढेपे व गल्लीतील कर्ती मंडळी स्वत:च्या घरातून तेल नेवून देवाला उजेडात ठेवत होते.माझ्या आजोबाच्या निधनांनतर माझे चुलते विश्वनाथ ढेपे सचिव झाले. ते आंतरराष्ट्रीय त्वचा व सौंदर्य तज्ञ डॉ.नितीन ढेपे यांचे वडील होत. चुलते सचिव झाल्यानंतरही बँक खात्यावर ९ रूपये शिल्लक होते.अध्यक्ष प्रकाश मोकाशे, उपाध्यक्ष दिलीप शिवराम मोकाशे, सदस्य रत्नाकर मोकाशे, अशोक मोकाशे, पद्माकर मोकाशे, नवनाथ ढोबळे हे मंडळ १२ वर्षापुर्वी निवडण्यात आले. माझे चुलते विश्वनाथ ढेपे, प्रकाश मोकाशे, रत्नाकर मोकाशे, नवनाथ ढोबळे, पद्माकर मोकाशे हे पेशाने शिक्षक. तर अशोक मोकाशे तलाठी व दिलीप मोकाशे हे वि.का.सोसायटीचे सचिव. सांगण्याचा मुद्दा म्हणजे सर्वजण अनुभवी व वेलशटल मंडळी.या सर्वांनी सेवाभावी वृत्तीने काम सुरू केले.
अणदूरचे मंदिर हेमाडपंथी व पुरातन होते.मंदिराचा बराच भाग पडला होता. सर्वप्रथम मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला.नंतर पुढील सभामंडपावरील नक्षीकाम व मंदिरासह रंगकाम करण्यात आले. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. संपूर्ण मंदिरात फरशी काम करण्यात आले. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधण्यात आला.तसेच मैलारपूरच्या मंदिरावर शिखर काम करण्यात येवून रंगकाम करण्यात आले. दर रविवारी अन्नदान करण्यासाठी मोठा हॉल बांधण्यात आला. एक वर्षापुर्वी चुलत्यानंतर माझ्यावर सचिव पदाची जबाबदारी पडली. माझ्या कार्यकालात अणदूरच्या मंदिरासमोर पत्र्याचे छत तसेच मंदिर कार्यालयासमोर पत्र्याच्या छताचे काम करण्यात आले. त्याचबरोबर कार्यालयासमोर हॉल टाईप बांधकाम करण्यात येवून फरशीकाम करण्यात आले. जणेकरून भाविकांना थांबण्यासाठी व जेवण्यासाठी व्यवस्था झाली.तसेच मैलारपुरात यंदा अन्नदानासाठी स्वयंपाक करण्यासाठी मोठा हॉल तसेच पिण्याची पाण्यासाठी दीड टँकर पाणी बसेल एवढी टाकी बांध्णयात आली.
त्याचबरोबर मैलारपुरात दर्शनबारी, कठडा वाढविणे आदी कामे पार पडली आहेत.मैलारपूर मंदिराचे यंदा पुन्हा रंगकाम करण्यात आले आहे. मंदिर ट्रस्टने पाठपुरावा केल्यामुळे शासनाच्या पैश्यातून बोरी नदीच्या पात्रावर घाट, सांस्कृतिक सभागृह ( अणदूर व मैलारपूर ) तसेच दोन्ही ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे.
उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे अणदूरचेच रहिवासी.त्यांची खंडोबावर अपार श्रध्दा आहे.त्यांच्या माध्यमातून मैलारपूर मंदिरासाठी नळदुर्गहून व वसंतनगरहून येणारा रस्ता रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तसेच मैलारपूरात विजेची स्वतंत्र डीपी मंजूर झाली असून, अंडरग्राऊंड विजेची व्यवस्था मंजूर झाली आहे. यात्रेसाठी मानाच्या काठया येतात.या काठ्यामुळे विजेच्या तारा तुटत असल्यामुळे अंडरग्राऊंड विजेची व्यवस्था मंजूर झाली आहे. पुढील वर्षापर्यंत हे काम पार पडण्याची अपेक्षा आहे.
सध्या मैलारपूरच्या यात्रा उत्सव काळात दर रविवारी अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते. देणारे जास्त व खाणारे कमी आहेत. केवळ भाविकांनी उदार अंत:करणातून दिलेल्या देणग्यामुळेच मंदिराचा विकास होवू शकला. आजपर्यंत देणगी दिलेल्या सर्व भक्तांना माझा मानाचा मुजरा...

*,  श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट
अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग )