G-PZND2NBDJ8
अणदूर येथे श्री खंडोबाची यात्रा २ डिसेंबर रोजी / ३ डिसेंबर रोजी पहाटे 'श्री' चे नळदुर्गमध्ये आगमन .... श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

देणा-याचे हात हजार...

चांगले काम केले की, लोक स्वत:हून मदत करतात,श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचा सचिव म्हणून काम करताना याचा अनुभव येत आहे.
अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट हा रिलीजस ट्रस्ट आहे. या ट्रस्टचे सभासद होण्याचा अधिकार फक्त श्री खंडोबाचे हक्कदार पुजा-यांनाच आहे.साधारण 1959 साल असावा. माझे आजोबा दत्तात्रय कोडींबा ढेपे, आप्पाराव तुळशीराम मोकाशे, बाबूराव यशवंत मोकाशे, माणिकराव सखाराम मोकाशे ही त्यावेळीची कर्ती मंडळी. त्यांनी खंडोबा देवस्थानच्या देखभालीसाठी ट्रस्ट स्थापन केला.घटना तयार करताना खरी मदत केली ती विशेष लेखा परिक्षक शंकरराव नाटेकर यांनी. नाटेकर हे अणदूरचे. ते गव्हरमेंटचे मराठवाड्यातील पाच जिल्ह्याचे विशेष लेखा परिक्षक होते.तेच श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी तयार केलेल्या घटनेमुळचे आज हा ट्रस्ट पुजा-यांच्या ताब्यात आहे.
पुर्वीच्या काळी ट्रस्टला कसलेही स्वउत्पन्न नव्हते.लाईटची व्यवस्था नव्हती.माझे आजोबा दत्तात्रय ढेपे व गल्लीतील कर्ती मंडळी स्वत:च्या घरातून तेल नेवून देवाला उजेडात ठेवत होते.माझ्या आजोबाच्या निधनांनतर माझे चुलते विश्वनाथ ढेपे सचिव झाले. ते आंतरराष्ट्रीय त्वचा व सौंदर्य तज्ञ डॉ.नितीन ढेपे यांचे वडील होत. चुलते सचिव झाल्यानंतरही बँक खात्यावर ९ रूपये शिल्लक होते.अध्यक्ष प्रकाश मोकाशे, उपाध्यक्ष दिलीप शिवराम मोकाशे, सदस्य रत्नाकर मोकाशे, अशोक मोकाशे, पद्माकर मोकाशे, नवनाथ ढोबळे हे मंडळ १२ वर्षापुर्वी निवडण्यात आले. माझे चुलते विश्वनाथ ढेपे, प्रकाश मोकाशे, रत्नाकर मोकाशे, नवनाथ ढोबळे, पद्माकर मोकाशे हे पेशाने शिक्षक. तर अशोक मोकाशे तलाठी व दिलीप मोकाशे हे वि.का.सोसायटीचे सचिव. सांगण्याचा मुद्दा म्हणजे सर्वजण अनुभवी व वेलशटल मंडळी.या सर्वांनी सेवाभावी वृत्तीने काम सुरू केले.
अणदूरचे मंदिर हेमाडपंथी व पुरातन होते.मंदिराचा बराच भाग पडला होता. सर्वप्रथम मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला.नंतर पुढील सभामंडपावरील नक्षीकाम व मंदिरासह रंगकाम करण्यात आले. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. संपूर्ण मंदिरात फरशी काम करण्यात आले. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधण्यात आला.तसेच मैलारपूरच्या मंदिरावर शिखर काम करण्यात येवून रंगकाम करण्यात आले. दर रविवारी अन्नदान करण्यासाठी मोठा हॉल बांधण्यात आला. एक वर्षापुर्वी चुलत्यानंतर माझ्यावर सचिव पदाची जबाबदारी पडली. माझ्या कार्यकालात अणदूरच्या मंदिरासमोर पत्र्याचे छत तसेच मंदिर कार्यालयासमोर पत्र्याच्या छताचे काम करण्यात आले. त्याचबरोबर कार्यालयासमोर हॉल टाईप बांधकाम करण्यात येवून फरशीकाम करण्यात आले. जणेकरून भाविकांना थांबण्यासाठी व जेवण्यासाठी व्यवस्था झाली.तसेच मैलारपुरात यंदा अन्नदानासाठी स्वयंपाक करण्यासाठी मोठा हॉल तसेच पिण्याची पाण्यासाठी दीड टँकर पाणी बसेल एवढी टाकी बांध्णयात आली.
त्याचबरोबर मैलारपुरात दर्शनबारी, कठडा वाढविणे आदी कामे पार पडली आहेत.मैलारपूर मंदिराचे यंदा पुन्हा रंगकाम करण्यात आले आहे. मंदिर ट्रस्टने पाठपुरावा केल्यामुळे शासनाच्या पैश्यातून बोरी नदीच्या पात्रावर घाट, सांस्कृतिक सभागृह ( अणदूर व मैलारपूर ) तसेच दोन्ही ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे.
उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे अणदूरचेच रहिवासी.त्यांची खंडोबावर अपार श्रध्दा आहे.त्यांच्या माध्यमातून मैलारपूर मंदिरासाठी नळदुर्गहून व वसंतनगरहून येणारा रस्ता रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तसेच मैलारपूरात विजेची स्वतंत्र डीपी मंजूर झाली असून, अंडरग्राऊंड विजेची व्यवस्था मंजूर झाली आहे. यात्रेसाठी मानाच्या काठया येतात.या काठ्यामुळे विजेच्या तारा तुटत असल्यामुळे अंडरग्राऊंड विजेची व्यवस्था मंजूर झाली आहे. पुढील वर्षापर्यंत हे काम पार पडण्याची अपेक्षा आहे.
सध्या मैलारपूरच्या यात्रा उत्सव काळात दर रविवारी अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते. देणारे जास्त व खाणारे कमी आहेत. केवळ भाविकांनी उदार अंत:करणातून दिलेल्या देणग्यामुळेच मंदिराचा विकास होवू शकला. आजपर्यंत देणगी दिलेल्या सर्व भक्तांना माझा मानाचा मुजरा...

*,  श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट
अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग )