G-PZND2NBDJ8
अणदूर येथे श्री खंडोबाची यात्रा २ डिसेंबर रोजी / ३ डिसेंबर रोजी पहाटे 'श्री' चे नळदुर्गमध्ये आगमन .... श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

जागरण - गोंधळ

विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ऋषीगणांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद सुरामध्ये आळवणी केली, अर्थात गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदू धर्मीयांमध्ये गोंधळाची परंपरा सुरु झाली, महाराष्ट्रा मध्ये याची खूप मोठी परंपरा आहे.  विशेषत: तुळजाभवनी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.
अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा, गळ्यात कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकडा गोंधळ' असे म्हटले जाते. देवीचा गुणगान गाणारा तो गोंधळी.

आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा धार्मिकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्याठिकाणी गोंधळ घालावयाचा आहे त्या ठिकाणी पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून अष्टदल काढले जाते अथवा धान्याच्या राशीवर श्रीफळासह कलश मांडून उसाच्या किंवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव तयार केला जातो व त्याला पुष्प माळा बांधली जाते. याला गोंधळाचा चौक असे म्हणतात. दिवटे पेटवतात, दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात.गोंधळाची सुरवात आवाहनाने होते, तें असे

तुळजापूर भवानी आई गोंधळाला यावं...
कोल्हापूर अंबाबाई गोंधळाला यावं ...
गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं ....
कुलस्वामिनी, ग्रामदेवी, आराध्य दैवते अशा सर्व दैवतांना गोंधळावर येण्याचे आवाहन केल्यांनतर देवीचे स्तवन करणारी पदे म्हंटली जातात त्यानंतर देवीचा जोगवा मागितला जातो

अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासूर मर्दना लागुनी
विविध तापाची करावया झाडणी
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा.... जोगवा मागीन
गोंधळयांकडे विवध वाद्ये असतात त्यापैकी संबळ हे सर्वात महत्वाचे वाद्य असून त्याच्या सोबतीला तुणतुणे व टाळही असतात. पूर्वीसारखा वेश परिधान करणारे गोंधळी फार थोडेच शिल्लक राहिले आहेत तर आता बदलत्या जमान्याप्रमाणे त्यांचा ही वेश बदलला आहे.

* जागरण

घर तेथे घराणे, घराणे तेथे कुळ, कुल तेथे कुळधर्म कुलाचार हा पाळलाच पाहिजे हा हिंदू संस्कृतीचा रिवाज आहे. कुलस्वामी श्रीखंडेरायाच्या कुलाचारांमध्ये 'जागरण' प्रमुख भाग आहे, जसा देवीच्या कुलाचारातील गोंधळ हा प्रमुख भाग आहे तितकेच महत्व जागरणाला आहे. आज धावपळीच्या जगामध्ये जागरण हा शब्द रात्रभर जागणे यापुरता मर्यादित स्वरुपात पाहिला जातो परंतु जागरण या शब्दाचा अर्थ जागृत करणे होय. आपली आंतरिक शक्ती जागृत करणे, आपला कुलस्वामी जागृत करणे म्हणजे जागरण. आज याच्याकडे लोककला म्हणून पहिले जाते, अनेक लोककलांची जननी म्हणूनही जागरणातील वाघ्या मुरुळी यांच्या कलेकडे बघितले जाते. जागरणाच्या परंपरेविषयी वाघ्या आपल्या कथनातून सांगतो कि पहिले जागरण श्रीकृष्णाने घातले होते म्हणून ते सर्वाना लागू झाले.
जागरणाची मांडणी ही गोंधळा प्रमाणेच असते पाटावर स्वच्छ पीत वस्त्रावर धान्याचे अष्टदल काढून अथवा धान्याची रास करून त्यावर श्रीफळासहित कलश मांडला जातो. उसाच्या अथवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव तयार करून त्यावर पुष्पमाला अड्कविली जाते. विड्याच्या पानावर सुपारी ठेवून या चौकावर खंडोबाचा टाक किंवा मूर्ती मांडली जाते. या चौकासमोर वाघ्या आणि मुरुळी गीत नृत्यामधून कुलस्वामी श्रीखंडेरायाची स्तुती करतात त्याबरोबरच यजमानांसाठी सुख समृद्धी भरभराट व आरोग्य मिळण्यासाठी विनवणी करतात. पुराणातील कथांचा  वर्तमानातील दुष्कृत्यांशी संबंध जोडीत भाविक भक्तांना सोबत घेऊन चालणारा हा धार्मिक विधी म्हणजे मल्हारी कथन, मनोरंजन व प्रबोधन याचा सुंदर मिलाप होय.
या सादरीकरणामध्ये आवाहन, गण, कथन व आरती अशी विभागणी असते तर वाघ्याच्या हातामध्ये डीमडी व मुरुळीच्या हातामध्ये घाटी(घंटी), सोबत करणा-यांकडे टाळ व तुणतुणे असते. जागरणाची सुरुवात करताना सर्व देवतांना चौकावर येण्याचे आवाहन केले जाते......

"जेजुरीच्या खंडेराया जागराला या....या...
पालीच्या तुम्ही गणराया जागराला या....या..."
अशा रितीने आवाहन झाल्यानंतर गण म्हंटला जातो.भाविक भक्तांनी मांडलेल्या जागरण विधीमध्ये वाघ्या मुरुळी भक्तांच्यावतीने मल्हारी मार्तंडाला विनवणी करतात ती अशी

माझिया विनंती मल्हारीला जाऊन सांगा
झोपले असतील देवा व्हावे जागा
देवा रे देवा तुझी सेवा घडली नाही कधी
गुंतलो प्रपंच बेडी मधी
तरुणपण गेले विषयाच्या नादी
त्यातुनी देवा भक्ती मार्ग दावा आधी
देवा तूची खंडोबा तुझा त्रिभुवनी झेंडा
रूप आगळे दिसे पिवळे नाव तुझे प्रचंडा
हातामध्ये सोन्याचा खंडा
हात जोडितो पदर पसरतो देवा येऊ नका रागा
झोपले असतील भक्तांचे देवा व्हावे आता जागा..
त्यानंतर गद्य पद्य मिश्रणातून मल्हार कथा ऐकवली जाते तर सरतेशेवटी आरती केली जाते.

ओवाळू आरती जय खंडेराया
ओवाळी म्हाळसा बानू लागली पाया
कापराच्या ज्योती पंचप्राणाची आरती
ओवाळी म्हाळसा बानू चरणी लागती
फुलाई माळीन देवाला हार घालिती
मालावती मुरुळी गुण आवडीने गाती
काया वाचा म्हणुनी आपला ओवाळीला राया
ओवाळी म्हाळसा बानू लागती पाया
नौखंडात याचे ठाणे शोभे पठारी
येळकोट बोलता भक्त लागले चरणी...

संपूर्ण जागरण हे तीन ते चार तास चालते,
सर्वसाधारणपणे घरामध्ये घडणा-या प्रत्येक शुभकार्याच्यावेळी जागरण गोंधळ करण्याची प्रथा प्रत्येक कुळामध्ये असते. याशिवाय प्रतिवार्षिक किंवा त्रैवार्षिक कुळधर्म कुलाचारावेळी जागरण गोंधळ घातला जातो.