अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी
अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रसिध्द देवस्थान श्री खंडोबास संपूर्ण श्रावण महिन्यात नळदुर्गच्या नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरीचे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे आणण्यात येते.सध्याच्या सुपरफास्ट युगात कावडीने पाणी आणण्याची ही प्रथा अजूनही कायम आहे.यंदाचा मान पुजारी अंकुश सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आला आहे.
नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नळ आणि दमयंती हे राजा - राणी राहत होते.दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा आदीमैलारहून नळदुर्गात प्रकट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी बाणाईस चंदनपुरीहून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीस प्रस्थान केले,ही अख्यायिका प्रसिध्द आहे.नंतर नळ राजाने नळदुर्गजवळील बोरी नदीजवळ मंदिर बांधून श्री खंडोबाच्या स्वयंभू मुर्तीची प्रतिष्ठापणा केली.श्री खंडोबाची स्वयंभू मुर्ती नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरूजाजवळ सापडली आहे.
कालांतराने श्री खंडोबाचे मंदिर अणदूर येथे बांधण्यात आले.नंतर अणदूर आणि नळदुर्गच्या ग्रामस्थात करार होवून श्री खंडोबाची मुर्ती नेण्या आणण्याचा करार झाला.अणदूर आणि नळदुर्ग हे अंतर चार ते साडेचार किलोमीटर आहे.श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावने दोन महिने वास्तव्य असते.दोन्ही ठिकाणी स्वतंत्र मंदिरे असून,देव मात्र एकच आहे.
आगळी वेगळी प्रथा
श्री खंडोबाचे वर्षभर अनेक यात्रा उत्सव असतात.श्रावण महिन्यात एक आगळीवेगळी प्रथा आहे.श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे.श्री खंडोबाच्या मुर्तीखाली महादेवाची पिंड अस्तीत्वात आहे.या पिंडीस आणि श्री खंडोबाच्या मुर्तीस श्रावण महिन्यात नागझरीच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरी हे मैलारपूर (नळदुर्ग) मंदिराच्या जवळ डोंगर कपारीत आहे.तेथून हे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे भल्या पहाटे आणण्यात येते.
डोंगरावर नागझरी झरा आहे.या ठिकाणी एक कुंड आहे.या झ-याचे पाणी बारा
महिने असते आणि विशेष म्हणजे ते गरम असते.गेली चार वर्षे उस्मानाबाद
जिल्ह्यात दुष्काळ होता,परंतु या दुष्काळातही या झ-याचे पाणी वाहत होते.हे
पाणी अत्यंत शुध्द आणि निर्मळ असून,ते गंगेचे पाणी असल्याची भाविकांची
धारणा आहे.
असा असतो दिनक्रम
यंदाचा मान अणदूरच्या पुजारी समाजातील अंकुश सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आलेला आहे.हे दोघे पाहटे तीन वाजता उठून अंघोळ करून धोतर (सोहळे)नेसून प्रत्येकी दोन घागरी (सोबत कावड) घेवून अनवाणी पायी (चप्पल न घालता) चालत निघतात.ते पहाटे चारपर्यंत नागझरीला पोहचतात.तेथे गेल्यानंतर परत अंघोळ करून प्रत्येकी दोन घागरी भरून कावडीने मैलारपूर मंदिरात जातात.तेथील मंदिरातील महादेवाच्या पिंडीस तांब्यातील पाणी घालून ते थेट अणदूरकडे प्रस्थान करतात.एकदा कावड उचलली की ती वाटेत कुठेही टेकावयाची नाही,असा नियम आहे.अणदूरच्या मंदिरात पहाटे साडेपाचपर्यंत ते पायी चालत पोहचतात.
मैलारपूर ते अणदूर हे अंतर चार किलोमीटर आहे.अंधा-या रात्री पावसाची तमा न बाळगता ही कावड आणली जाते.जाण्यायेण्याचे अंतर हे ९ किलोमीटर आहे.हे जिकरीचे काम अंकुश सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे पार पाडत आहेत.कावडीने पाणी आणणे ही देवाची सेवा असून,ही सेवा करण्यात कसलेही कष्ट जाणवत नसल्याचे अंकुश सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे सांगितले.
अणदूरच्या श्री खंडोबाची सकाळी ८ वाजता आणि रात्री ८ वाजता महापुजा होते.या दोन्ही वेळेस श्रावण महिन्यात श्री खंडोबाच्या मुर्तीस नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.इतरही महिन्यातही दोन वेळेस नित्यनियमाने पुजा होते,त्याचा मान माऊली मोकाशे यांना आहे.
खडी रविवार
श्रावण महिन्यात सर्व ठिकाणी सोमवारी उपवास केला जातो,परंतु अणदूरमध्ये रविवारी उपवास केला जातो आणि तो खडी उभा राहून केला जातो.श्री खंडोबाची सकाळी ९ वाजता पुजा आटोपली की,उपवास करणारे उभे राहतात,ते दिवसभर जेवण करत नाहीत,उभे राहूनच फराळ करतात.नंतर रात्रीची पुजा झाल्यानंतर प्रदक्षिणा संपल्यानंतर बसतात.तब्बल बारा तास उभे राहून हा उपवास केला जातो.यास खडी रविवार म्हटला जातो.किमान दीडशे ते दोनशे लोक खडी रविवारचा उपवास करतात.त्याचबरोबर रात्रीच्या पुजेच्या वेळी पुजारी समाजातील प्रत्येक घरातून एका व्यक्तीने सोहळ्यामध्ये येवून श्री खंडोबास पुजेच्या वेळी १०१ बेलपत्र घालण्याची प्रथा आहे.ही प्रथा आजही कायम आहे.
अनादी कालापासून प्रथा
अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी कावडीने आणण्याची प्रथा अनादी कालापासून सुरू आहे.ही प्रथा सध्याच्या सुपरफास्ट युगातही कायम ठेवण्यात आली आहे,असे श्री खंडोबा मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी सांगितले.