अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा येत्या २७ नोव्हेंबर रोजी भरत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात्रेची जय्यत करण्यात येत आहे.
अणदूरच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ .३० वाजता श्री खंडोबाची महापूजा होईल. दिवसभर भंडारा - खोबरे उधळणे, महानैवेद्य दाखवणे आदी कार्यक्रम पार पडतील. रात्री दहा वाजता श्रीचा छबीना - मिरवणुक काढण्यात येईल. रात्री १२ वाजता नळदुर्गच्या मानकर्यांचे आगमन, त्यानंतर मानपानाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अणदूर-मैलारपूर(नळदुर्ग) च्या मानकर्यांत खंडोबाची मूळ मूर्ती नेणे व आणण्याचा लेखी करार होईल. मध्यरात्री २.३० वाजता खंडोबाच्या मूर्तीच्या पालखीचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल. पहाटे ५ वाजता मैलारपूर (नळदुर्ग) मंदिरात खंडोबाचे आगमन नंतर विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.
अणदूरच्या यात्रेनिमित्त श्री. खंडोबाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. श्री खंडोबा मंदिर समिती व श्री खंडोबा यात्रा कमिटी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहे.
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८ प्रमुख ठिकाणे आहेत, पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता म्हणून या स्थानाला अन्यन्यसाधारण महत्व आहे, आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार कि.मी. आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. अणदूरच्या यात्रेनंतर खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होणार आहे.
२८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा आखाडा
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा भव्य आखाडा भरणार आहे, या आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत पैलवान हजेरी लावणार असून, ११ हजार ते ५१ हजार बक्षिस ठेवण्यात आले आहे, त्याची जय्यत तयारी सुरु आहे,