श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

दमयंतीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा - बाणाई विवाह नळदुर्गमध्ये...

मणी आणि मल्ल या उन्मत्त दैत्यांचा वध करण्यासाठी महादेव तथा शंकराने श्री खंडोबा तथा मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण केला, ही आख्यायिका सर्वश्रुत आहे.मात्र श्री खंडोबा नळदुर्ग आणि अणदूरमध्ये कसे प्रकट झाले,या स्थानाचे महत्व काय,याची आख्यायिका थोडक्यात अशी ....
कृतयुगामध्ये नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात नळ - दमयंती राजा राणी - रहात होते.(नंतरचे नळ - दमयंती राजा राणी वेगळे आहेत). दमयंती राणी ही श्री खंडोबाची निस्सीम भक्त होती.राणी रोज पहाटे उठून  श्री खंडोबाच्या दर्शनासाठी आदी - मैलार (बीदरपासून दहा किलोमीटर अंतरावर,कर्नाटक राज्य) येथे जात होती.किल्ल्यामध्येच असलेल्या एका कल्पवृक्षावर बसून राणी आदी मैलारला जात असल्याचे मार्तण्ड भैरव ग्रंथामध्ये लिहिले आहे.( झी मराठीच्या  जय मल्हार मालिकेमध्येही हेच दाखवण्यात आले आहे) एक वर्षे उलटून गेल्यानंतर एकेदिवशी राजा पहाटे उठला तर राणी दिसेना,तेव्हा त्याला संशय आला आणि दुस-या दिवशी तिला न सांगता,तिच्या पाठीमागे गेला. राणी कल्पवृक्षावर बसली होती तर राजा झाडाच्या पारंब्या धरून लोंबकळत आदी मैलारला गेला.
राणी जेव्हा मंदिरात गेली, तेव्हा श्री खंडोबाने तुझा पती मागे लपला असल्याचे सांगून त्या दिवशी दर्शन दिले नाही. तेव्हा राजाने माफी मागून श्री खंडोबास नळदुर्गमध्ये प्रकट होण्याची विनंती केली. त्यानंतर दमयंतीच्या भक्तीसाठी आणि नळ राजाच्या विनंतीनुसार श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रकट झाले.
श्री खंडोबाने दमयंती राणीला दिलेल्या दृष्टांताप्रमाणे नळ राजाने (आज ज्या ठिकाणी उपली बुरूज उभा आहे )त्या ठिकाणी मजुराकरवी खोदकाम केले असता, एका दगडी मुर्तीतून रक्ताची धार वरती आली.तोच दगड (तांदळा) राजाने श्री खंडोबाची मूर्ती म्हणून प्रतिष्ठापना केली. म्हणूनच या दगडी मुर्तीवर एका बाजूला खच पडलेली आजही दिसते. ही दगडी मूर्ती स्वयंभू असून,ती जागृत आहे.पुढे दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबाने बाणाईला चंदनपुरीतून आणून याच भुईकोट किल्ल्यात लग्न केले आणि नंतर जेजुरीला नेले.श्री खंडोबा आणि बाणाईच्या विवाहस्थळामुळे श्री क्षेत्र अणदूर - मैलारपूर (नळदुर्ग) ला विशेष महत्व आहे.
कालांतराने नळ राजाने बांधलेले मंदिर १६६४ मध्ये इब्राहिम आदीलशहाने उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी उपली बुरूज बांधला. त्यानंतर  श्री खंडोबाचे मंदिर बोरी नदीच्या काठावर बांधण्यात आले.या मंदिरातही १७ व्या शतकात एक अनिष्ट कृत्य करून मंदिर भ्रष्ट करण्यात आले, नंतर श्री खंडोबा मंदिर अणदूरला बांधण्यात आले. अणदूरचे मंदिर तीन वेगवेगळ्या काळात झाल्याचे दाखले आहेत.मुख्य शिखर,सभामंडप आणि तटबंदी भिंत हे वेगवेगळ्या काळात तयार करण्यात आलेत. या मंदिरास सध्या दोन प्रवेशव्दार असून,मंदिर हेमाडपंथी आहे.मंदिर पुरातन असून,सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.या मंदिरास राजश्री शाहू महाराजांनी जमीन दान केल्याचे दाखले सापडले आहेत,तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी सभामंडप बांधून दिल्याचे पुरावे आहेत.कालांतराने मैलारपूर (नळदुर्ग) येथे कोरपे नावाच्या भक्ताने बिनशिखराचे मंदिर बांधले ( जुन्या मंदिरापासून अर्धा किलोमीटर अलिकडे)आणि श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग)येथे पावणे दोन महिने वास्तव्य राहील असा लेखी करार अणदूर आणि नळदुर्ग या दोन वेगवेगळ्या गावाच्या मानक-यांमध्ये करण्यात आला आणि आज अनेक वर्षे ही प्रथा गुण्यागोविंदाने सुरू आहे.गेल्या काही वर्षामध्ये अणदूरच्या श्री खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे तसेच मैलारपूर मंदिरावर शिखर बांधण्यात आले आहे.त्याची अनेक वेळा रंगरंगोटीही करण्यात आलेली आहे.
श्री खंडोबाची दररोज दोन वेळा पूजा करण्यात येते.दगडी मुर्तीवर हळदीचा लेप देवून त्याव्दारे नाक,डोळे आणि मुकूट बसवण्यात येतो.रोज अलंकार आणि वस्त्र बदलण्यात येतात.दिवाळी पाडव्यादिवशी सोन्याचे दागदागिने घालण्यात येतात.या दिवशी श्री खंडोबाचे रूप पाहण्याजोगे असते.
अणदूरची श्री खंडोबा यात्रा मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदीपावली रोजी असते.त्यानंतर श्री खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग)येथे प्रस्थान होते.मैलारपूरला दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते.अनेकजण दर रविवारी खेटे म्हणून आवर्जुन हजेरी लावतात.भक्तगण हळदीचा भंडारा आणि खोबरे उधळतात.त्याचबरोबर तळी उचलणे,जागरण गोंधळ इत्यादी विधी पार पडत असतात.या ठिकाणी येणा-या भाविकांना दर रविवारी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत अन्नदान केले जाते.त्यानंतर पौष पोर्णिमेला मैलारपूरला मोठी यात्रा भरते.यात्रेनंतर अष्टमीची पूजा करून श्री खंडोबा पुन्हा अणदूरला जातात.

मैलारपूर (नळदुर्ग) ते अणदूर हे अंतर फक्त चार किलोमीटर आहे,परंतु एकच मूर्ती मात्र तिची प्रतिष्ठापना दोन ठिकाणी करण्याचे महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे.मंदिरे दोन आणि देव एकच आहे.दोन्ही ठिकाणचे पुजारी एकच असून, मंदिर ट्रस्ट सुध्दा एकच आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग ) आणि अणदूर ही ठिकाणे तुळजापूरपासून ३५ किलोमीटर, सोलापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर आहेत.तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर अणदूर आणि मैलारपूरच्या श्री खंडोबाचे दर्शन घेणे हे पुण्यकर्म मानले जाते. कारण तुळजाभवानी ही माता पार्वतीचे रूप तर श्री खंडोबा महादेवाचा अवतार आहे.
बोला,येळकोट येळकोट, जय मल्हार...
श्री खंडोबा आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करोत हीच श्री खंडोबा चरणी प्रार्थना...

- श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट
अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग )
ता.तुळजापूर,जि.उस्मानाबाद


-----

> श्री खंडोबाचे राजधानी ठिकाण - जेजुरी जि. पुणे
> पहिली पत्नी म्हाळसा, हिचे माहेर - नेवासे जि. नगर
> दुसरी पत्नी बाणाई, हिचे माहेर -चंदनपुरी ता. मालेगांव जि. नाशिक

> श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह पाली जि. सातारा येथे झाला होता...
> श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता...
> पालाई हिच्या भक्तीसाठी श्री खंडोबाने पहिला विवाह पाली येथे केला...
> नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीसाठी दुसरा विवाह नळदुर्ग येथे केला...