श्री खंडोबा,अणदूर मंदिरात दर रविवारी अन्नदान सुरु आहे. भाविकांनी सढळ हातानी मदत करावी, ही विनंती.

श्री खंडोबाचे अणदूरहुन नळदुर्गमध्ये आगमन

नळदुर्ग: अणदूरची यात्रा पार पडल्यानंतर  श्री खंडोबाच्या मूर्तीचे अणदूर येथील मंदिरातून नळदुर्ग (मैलारपूर) येथील मंदिरात गुरुवारी (ता.28) पहाटे चार वाजता वाजत-गाजत पालखीतून आगमन झाले. यावेळी मूर्ती देवाणघेवाणीबाबत नळदुर्गचे मानकरी व अणदूरचे मानकरी यांच्यामध्ये पूर्वापार चालत आलेला लेखी करार झाला. नळदुर्गकरांनी मैलारपूर मंदिर मार्गावर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या.

अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही गावात चार किलोमीटर अंतर आहे. या दोन्ही गावात श्री खंडोबाची मंदिरे असली तरी मूर्ती मात्र एकच आहे. श्री खंडोबाची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते. अणदूरहुन नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात मूर्ती नेण्या - आणण्याचा लेखी करार केला जातो. राज्यातील नव्हे देशातील हे एकमेव उदाहरण आहे.

मानकऱ्यांमध्ये लेखी करार
श्री खंडोबा व बाणाईचा विवाह नळदुर्ग येथे झाल्याची आख्यायिका असल्यामुळे नळदुर्ग (मैलारपूर) हे खंडोबाच्या भाविकांसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे.  अणदूर येथील यात्रा बुधवारी (ता. 27) मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली. बुधवारी रात्री छबिन्याची सांगता होऊन नळदुर्गच्या मानकऱ्यांचे आगमन झाले. अणदूर व नळदुर्ग या दोन्ही गावांच्या मानकऱ्यांमध्ये देवाची मूर्ती नेण्याचा, तसेच आणण्याचा लेखी करार करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मूर्ती नळदुर्गकडे मार्गस्थ झाल्या.

विधिवत पूजा करून मूर्तींची प्रतिष्ठापना
गुरुवारी पहाटे तीन वाजता श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीतून नळदुर्गकडे मार्गस्थ झाली. पहाटे पाच वाजता मैलारपूर-नळदुर्गमध्ये आगमन झाले. त्यानंतर विधिवत पूजा करून सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील पावणे  दोन महिने श्री खंडोबा मूर्ती मैलारपूर येथे वास्तव्यास असणार आहे. पौष पौर्णिमेस (10 व 11 जानेवारी) यात्रोत्सव साजरा होणार आहे. या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.