२२ नोव्हेंबर रोजी श्री खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान; देवस्थान समितीकडून जय्यत तयारी
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा देवाची प्रसिद्ध यात्रा येत्या २१ नोव्हेंबर रोजी भरणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्री खंडोबा देवस्थान समिती आणि यात्रा कमिटीने यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी अणदूर येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील. यामध्ये श्री खंडोबाची महापूजा आणि रात्री छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'गावे दोन, मंदिर दोन आणि देव एक' ही अनोखी परंपरा. श्री खंडोबाच्या मूर्तीचे वास्तव्य अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग) येथील मंदिरात पावणे दोन महिने असते. या परंपरेनुसार, यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २२ नोव्हेंबर रोजी, श्री खंडोबाचे आगमन मैलारपूर (नळदुर्ग) येथील मंदिरात होणार आहे.
देवाच्या मूर्तीचे स्थलांतर करण्यापूर्वी अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही गावांतील मानकरी मंडळींमध्ये रीतसर लेखी करार केला जातो. त्यानंतरच देवाच्या मूर्तीला पालखीमध्ये विराजमान करून वाजत गाजत नळदुर्गकडे नेले जाते.
मैलारपूर (नळदुर्ग) हे स्थळ श्री खंडोबा आणि बाणाई यांचे विवाह स्थळ म्हणून ओळखले जाते. येथील मंदिरात चंपाषष्टी यात्रा आणि पौष पौर्णिमा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या दोन्ही यात्रा उत्सवांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात.
