श्री खंडोबाचे अणदूरकडे प्रस्थान
श्री खंडोबा: दोन मंदिरे, एक मूर्ती, अतूट भक्ती - एक अनोखी परंपरा
महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यात, अणदूर आणि नळदुर्ग या दोन गावांमध्ये, एक अशी अनोखी परंपरा जिवंत आहे जी केवळ धार्मिक श्रद्धेचेच नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि सहिष्णुतेचेही एक अद्वितीय उदाहरण मांडते. ही परंपरा आहे श्री खंडोबा, महादेवाचा अवतार मानल्या जाणाऱ्या दैवताची, ज्यांची एकच मूर्ती दोन मंदिरांमध्ये वर्षभर विभागून ठेवली जाते.
नळदुर्ग ते अणदूर: ऐतिहासिक प्रवास
श्री खंडोबाची ही कथा नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यापासून सुरू होते, जिथे त्यांची स्वयंभू मूर्ती सापडली असे मानले जाते. नळ-राजा आणि त्यांची पत्नी दमयंती यांच्या अतूट भक्तीने प्रसन्न होऊन, श्री खंडोबा या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी नळदुर्ग किल्ल्यात बानूबाईशी दुसरा विवाह केला, अशी आख्यायिका आहे.
इतिहासात अनेक उलथापालथी झाल्या. इब्राहिम आदिलशहाने किल्ल्यातील मंदिरावर उपली बुरुज बांधला, नंतर मंदिर बोरी नदी काठी बांधण्यात आले , येथेही निजामशाहीत मंदिरात गाय कापली गेली, अशा घटनांमुळे मूर्तीचे स्थलांतर होत राहिले. अखेर, ही मूर्ती अणदूर येथे आणण्यात आली. या मंदिराला छत्रपती शाहू महाराजांनी जमीन दिली, तर अहिल्यादेवी होळकर यांनी सभामंडप बांधला. अशा प्रकारे, अणदूर हे गाव श्री खंडोबाच्या भक्तीचे प्रमुख केंद्र बनले.
देवाचा करार: एकमेव उदाहरण
अणदूरमध्ये मंदिर स्थिरावल्यानंतरही, नळदुर्गच्या लोकांनी आपला देव म्हणून दावा सोडला नाही. यातून निर्माण झालेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी दोन्ही गावांनी एक अभूतपूर्व करार केला - देवाचा करार. या करारानुसार, श्री खंडोबाची मूर्ती वर्षातील सव्वा दहा महिने अणदूरमध्ये आणि उर्वरित पावणे दोन महिने नळदुर्गच्या मैलारपूर येथे राहते. दोन्ही गावात चार किलोमीटर अंतर आहे.
यात्रा: श्रद्धेचा समुद्र
मूर्तीचे हे स्थलांतर केवळ एक औपचारिकता नसून, एक भव्य उत्सव असतो. दोन्ही गावांतून पालखीतून वाजत-गाजत मिरवणुका निघतात, ज्यात अनेक भाविक सहभागी होतात. यावेळी, दोन्ही गावांचे मानकरी एकमेकांशी लेखी करार करतात, जो 'देवाचा करार' म्हणून ओळखला जातो. असा अनोखा करार जगात कुठेही पाहायला मिळत नाही.
अणदूरची यात्रा यावर्षी २ डिसेंबर रोजी आहे , त्यानंतर मूर्ती मैलारपूरला नेली जाते. या दरम्यान दर रविवारी किमान ५० हजार भाविक येतात, तर पौष पौर्णिमेला ही संख्या ५ लाखांपर्यंत पोहोचते. यात्रेत ७०० हून अधिक नंदीध्वज (काठ्या) सहभागी होतात . या यात्रांमध्ये नंदीध्वजांचे नाच, वारूंचे बेधुंद नाच, अभिषेक, नेवेद्य इत्यादी अनेक धार्मिक विधी आणि परंपरा पाळल्या जातात.
श्रद्धा आणि ऐक्य
श्री खंडोबाची ही अनोखी परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेचेच नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि सहिष्णुतेचेही एक ज्वलंत उदाहरण आहे. दोन गावांमधील हा देवाचा करार, परस्पर आदर आणि समंजसपणाच्या भावनेला बळकटी देतो. ही परंपरा आपल्याला शिकवते की, श्रद्धा आणि भक्ती या सीमा ओलांडून एकात्मतेची भावना निर्माण करू शकतात. श्री खंडोबाची ही अनोखी परंपरा आजही जिवंत आहे आणि भाविकांच्या हृदयात श्रद्धेचा अखंड दीप तेवत आहे.
- सुनील ढेपे, सचिव , श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग
मो - ७३८७९९४४११
अणदूरची श्रावण परंपरा: खडी रविवारचा अनोखा उपवास
श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीचा महिना. या पवित्र महिन्यात देशभरात श्रावण सोमवारचे व्रत केले जाते, पण धाराशिव जिल्ह्यातील अणदूर गावात मात्र श्रावण महिन्याच्या शेवटच्या दोन रविवारांना 'खडी रविवार' हा अनोखा उपवास केला जातो. ही परंपरा येथील श्री खंडोबाच्या देवस्थानाशी निगडीत आहे.
अणदूर हे गाव श्री खंडोबाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असल्याने श्रावण महिन्यात येथे खंडोबाची विशेष पूजा-अर्चना केली जाते. दोन पुजारी चार किलोमीटर अंतरावरून चालत कावडीने पाणी आणतात आणि त्याच पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. महिनाभर पौराणिक कथावाचन आणि रात्रीच्या पूजेत १०१ बिल्व पत्र अर्पण करण्याची प्रथा आहे. एका सोमवारी गावातील सर्व महादेव मंदिरांना वाद्य वाजवत जाऊन अभिषेक केला जातो.
या सर्व परंपरांमध्ये 'खडी रविवार' हा उपवास विशेष स्थानिक महत्त्व राखतो. श्री खंडोबाची दररोज दोन वेळा पूजा केली जाते. सकाळी ९ वाजता पूजा झाल्यावर दिवसभर उभे राहण्याची आणि रात्री १० वाजता पूजा होईपर्यंत बसण्याची परवानगी नाही, ही प्रथा आहे. तसेच रात्रीची पूजा झाल्याशिवाय जेवण करायचे नाही. हा कडक उपवास श्रावण महिन्याच्या शेवटच्या दोन रविवारी अणदूर येथील पुजारी समाजातील लोक आणि गावातील असंख्य भाविक करतात.
श्रावण महिन्यात खडी रविवारचा उपवास करण्यामागची नेमकी कथा उपलब्ध नाही, पण ही परंपरा अणदूरच्या श्रावण महिन्याच्या उत्साहाला आणि भक्तीला एक वेगळे परिमाण देते. या अनोख्या परंपरेमुळे अणदूरमध्ये श्रावण महिना हा केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरतो.
सुनील ढेपे, सचिव , श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग
मो - ७३८७९९४४११
अणदूर ते नागझरी: एक अतूट श्रद्धेची परंपरा
अणदूरचे श्री खंडोबा मंदिर हे केवळ एक जागृत देवस्थान म्हणूनच नव्हे, तर एक अतूट श्रद्धेच्या आणि परंपरेच्या प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची ख्याती केवळ श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असल्यामुळेच नाही, तर येथे जपल्या जाणाऱ्या अनेक विधिपूर्वक परंपरांमुळेही आहे. त्यांपैकी एक म्हणजे श्रावण महिन्यात श्री खंडोबांना नागझरी येथील होमकुंडातील पाण्याने अभिषेक करण्याची प्रथा.
नागझरी हे मैलारपूर (नळदुर्ग) श्री खंडोबा मंदिराजवळच असलेल्या एका डोंगरात वसलेले आहे. येथील होमकुंडातील पाणी वर्षभर गरम राहते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या कुंडाचे पाणी १९७२ च्या भीषण दुष्काळातही आटले नव्हते, ही बाब या श्रद्धेला आणखी बळकटी देते.
अणदूरहून नागझरी हे अंतर जवळपास चार किलोमीटर आहे, नागझरीहून मैलारपूर (नळदुर्ग ) आणि नंतर अणदूर अशा प्रकारे, अणदूरच्या पुजारी रोहित बाळू मोकाशे आणि शुभम महेश मोकाशे दररोज एकूण नऊ ते दहा किलोमीटर अंतर चालून कापतात. श्रावण महिन्याच्या प्रत्येक पहाटे, ते पाऊस-वाऱ्याची पर्वा न करता ही यात्रा करतात. त्यांच्या खांद्यावर कावड असते आणि त्या कावडीवर प्रत्येकी दोन अश्या एकूण चार घागरी असतात.
मैलारपूर (नळदुर्ग ) हून एकदा कावड हाती घेतली की ती खाली टेकवू नये, असाही एक कडक नियम आहे. या नियमामुळे ही यात्रा आणखीनच आव्हानात्मक बनते. तरीही, हे पुजारी अविरतपणे, श्रद्धेने आणि समर्पणाने ही परंपरा जपत आहेत. ते नागझरी येथे पोहोचतात, स्नान करतात आणि मग होमकुंडातील पाणी घागरीत भरतात.
यानंतर हे पुजारी मैलारपूर (नळदुर्ग) श्री खंडोबा मंदिराकडे जातात. तेथे एक घागर महादेवाला अर्पण केली जाते आणि एका रिकाम्या घागरीत जवळच्या नदीचे पाणी भरून ते परत येतात. संपूर्ण श्रावण महिना हा त्यांचा दिनक्रम असाच चालू राहतो.
आजच्या सुपरफास्ट युगातही, जिथे प्रत्येक गोष्ट जलदगतीने होते, तिथे ही परंपरा अजूनही कायम आहे. चालत जाऊन, घागरींमध्ये पाणी आणण्याची ही पद्धत, आणि त्यातही कावड खाली न टेकवण्याचा नियम, हे केवळ एक धार्मिक विधी नसून, ती एक निष्ठा, श्रद्धा आणि परंपरेचे जतन करण्याचा एक मार्ग आहे.
आज नागपंचमीच्या निमित्ताने, आपण या परंपरेला आणि त्यामागील भक्तीभावाला वंदन करूया.
- सुनील ढेपे, सचिव , श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग
मो - ७३८७९९४४११
अणदूरच्या श्री खंडोबाचे सिंहासन चांदीचे होणार
नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी दीड महिन्यात काम पूर्ण करणार
अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबाचे सिंहासन बदलण्यात आले असून, हे सिंहासन चांदीचे करण्यात येत आहे. त्यासाठी ३५ किलो चांदी लागणार असून २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करणार आहेत.
श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे अणदूर येथील श्री खंडोबा तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. या खंडोबाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधील भाविक दररोज येत असतात. हे मंदिर पुरातन असून साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
या मंदिरातील पुरातन सिंहासन पितळी होते, त्याची काही प्रमाणात झीज झाल्याने ते काढून सागवानमध्ये सिंहासन तयार करण्यात आले आहे. त्यावर आता चांदीने बसवण्यात येणार असून , सुंदर नक्षीकाम देखील करण्यात येणार आहे. या कामासाठी ३५ किलो चांदी लागणार असून २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. दीड महिन्यात हे काम पूर्ण करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
परेश कुलकर्णी यांना सोमवारी या कामाचे कंत्राट देण्यात आले , यावेळी मंदिर समितीच्या वतीने उपाध्यक्ष अविनाश मोकाशे यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा सत्कार करणात आला. यावेळी अध्यक्ष बालाजी मोकाशे, सचिव सुनील ढेपे, सदस्य दीपक मोकाशे, बाळू येळकोटे, महादेव खापरे आदी उपस्थित होते.
ज्या भाविकांना या पुण्यकामास आर्थिक मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी श्री खंडोबा देवस्थान,एसबीआय बँक खाते नंबर - 11507329802 IFS Code SBIN0003404 यावर रक्कम जमा करावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने सचिव सुनील ढेपे यांनी केले आहे.
श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे
सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड
अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर - नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे, उपाध्यक्षपदी अविनाश मोकाशे यांची नव्याने तर सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
अणदूर - नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा हे जागृत देवस्थान असून, श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे राज्यात प्रसिद्ध आहे. श्री खंडोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश . तेलंगणा येथील हजारो भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असतात.
१० वर्षानंतर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी बदलेले आहेत. सचिव सुनील ढेपे वगळता अन्य आठ सदस्य नवीन घेण्यात आले आहेत. मावळते अध्यक्ष प्रकाश मोकाशे यांनी नव्या पदाधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवला.
नवीन पदाधिकारी असे : अध्यक्ष - बालाजी सुधाकर मोकाशे , उपाध्यक्ष - अविनाश दिलीप मोकाशे , सचिव - सुनील मधुकर ढेपे
सदस्य - महेश विठ्ठल मोकाशे, शशिकांत यादव मोकाशे , दिपक अशोक मोकाशे ,महादेव गंगाधर मोकाशे , अमोल रमेश मोकाशे , सदानंद खंडेराव येळकोटे.
स्वर्गाची सुंदरी, नवरी नटली नंतर राहुल शिंदेचं आलं अणदूर - नळदुर्गच्या खंडोबावर लोकप्रिय गाणं
उस्मानाबाद - स्वर्गाची सुंदरी, नवरी नटली , पुण्याचा राघू आदी लोकप्रिय गाणे गाणाऱ्या गायक राहुल शिंदे यांचं खंडोबावर नवीन दमदार गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्गच्या श्री खंडोबा आख्यायिकेवर पत्रकार सुनील ढेपे यांनी हे गाणं लिहिले आहे.
अणदूर आणि नळदुर्ग हे दोन वेगवेगळे गावे असली तरी श्री खंडोबाची मूर्ती एकच आहे. अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने श्री खंडोबाचे वास्तव असते. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह याच ठिकाणी झाला आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राला अनन्य साधारण महत्व आहे.
याच खंडोबा आख्यायिकेवर पत्रकार सुनील ढेपे यांनी 'बघा माझा खंडोबा कसा डोलतो' हे भक्तीगीत लिहिले असून, गायक राहुल शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात हे गायलं आहे.सहगायक म्हणून शाहीर बापु पवार आणि सचिन अवघडे यांनी भाग घेतला आहे. उस्मानाबाद लाइव्ह आणि मुक्तरंग म्युझिक चॅनलने हे गाणं रिलीज केले आहे.
अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा ५ डिसेंबर रोजी आहे. त्यानंतर श्री खंडोबाचे नळदुर्गमध्ये आगमन होते, त्यानंतर दर रविवारी यात्रा तर पौष पौर्णिमेला महायात्रा भरते , दर रविवारच्या यात्रेला किमान २० ते ३० हजार भाविक आणि महायात्रेला ५ लाख भाविक येत असतात. कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा झाली नसली तरी यंदा यात्रा नेहमीप्रमाणे भरण्याची शक्यता आहे.
युट्युब लिंक
अणदूर - नळदुर्गचे खंडोबा मंदिर दर रविवारी बंद
अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर - नळदुर्गचे श्री खंडोबा मंदिर यापुढे दर रविवारी बंद राहणार आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी पुढील आदेश येईपर्यंत रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णाची संख्या वाढल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच दर रविवारी मंदिरे आणि प्रार्थनास्थळेही बंद राहणार आहेत, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अणदूर - नळदुर्गचे श्री खंडोबा मंदिर दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
अणदूर - नळदुर्गचे श्री खंडोबा मंदिर जागृत देवस्थान असल्याने दर रविवारी दोन्ही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांनी यापुढे पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी केले आहे.
कोरोनाचा फटका : नळदुर्गच्या श्री खंडोबाची महायात्रा रद्द
नळदुर्ग : अणदूर पाठोपाठ नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेला कोरोना महामारीचा फटका बसला आहे. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणारी महायात्रा रद्द करण्यात आली आहे. या तिन्ही दिवशी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, मात्र प्रमुख मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत.
मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा असंख्य लोकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून किमान पाच ते सात लाख भाविक यात्रेसाठी हजेरी लावत असतात. श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळ असल्यामुळे आणि जवळच भुईकोट किल्ला असल्यामुळे यात्रेला मोठी गर्दी असते.
यंदाची यात्रा दि. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणार होती. २८ जानेवारी रोजी छबिना निघणार होता. २९ जानेवारी रोजी कुस्तीचा फड रंगणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे तसेच कुस्त्या होणार नाहीत. आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच यात्रा रद्द करण्यात आली आहे.
२७ ते २९ जानेवारी दरम्यान मैलारपूर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तसेच व्यवसायीकांना दुकान लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. याबाबत रविवारी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत नियमावली वाचून दाखवण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी , आरोग्य विभाग, नगर पालिका कर्मचारी, मानकरी, पुजारी, लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
धार्मिक विधी पार पडणार
कोरोना महामारीमुळे महायात्रा रद्द करण्यात आली असली तरी सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. २७ ते २९ जानेवारी हे तीन मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.नळदुर्ग व अणदुरच्या प्रत्येकी पंचवीस मानक-यांना या काळात पारंपरिक विधी करण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी मैलारपूर मंदिराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. बाहेर गावच्या भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Read More