श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीचा महिना. या पवित्र महिन्यात देशभरात श्रावण सोमवारचे व्रत केले जाते, पण धाराशिव जिल्ह्यातील अणदूर गावात मात्र श्रावण महिन्याच्या शेवटच्या दोन रविवारांना 'खडी रविवार' हा अनोखा उपवास केला जातो. ही परंपरा येथील श्री खंडोबाच्या देवस्थानाशी निगडीत आहे.
अणदूर हे गाव श्री खंडोबाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असल्याने श्रावण महिन्यात येथे खंडोबाची विशेष पूजा-अर्चना केली जाते. दोन पुजारी चार किलोमीटर अंतरावरून चालत कावडीने पाणी आणतात आणि त्याच पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. महिनाभर पौराणिक कथावाचन आणि रात्रीच्या पूजेत १०१ बिल्व पत्र अर्पण करण्याची प्रथा आहे. एका सोमवारी गावातील सर्व महादेव मंदिरांना वाद्य वाजवत जाऊन अभिषेक केला जातो.
या सर्व परंपरांमध्ये 'खडी रविवार' हा उपवास विशेष स्थानिक महत्त्व राखतो. श्री खंडोबाची दररोज दोन वेळा पूजा केली जाते. सकाळी ९ वाजता पूजा झाल्यावर दिवसभर उभे राहण्याची आणि रात्री १० वाजता पूजा होईपर्यंत बसण्याची परवानगी नाही, ही प्रथा आहे. तसेच रात्रीची पूजा झाल्याशिवाय जेवण करायचे नाही. हा कडक उपवास श्रावण महिन्याच्या शेवटच्या दोन रविवारी अणदूर येथील पुजारी समाजातील लोक आणि गावातील असंख्य भाविक करतात.
श्रावण महिन्यात खडी रविवारचा उपवास करण्यामागची नेमकी कथा उपलब्ध नाही, पण ही परंपरा अणदूरच्या श्रावण महिन्याच्या उत्साहाला आणि भक्तीला एक वेगळे परिमाण देते. या अनोख्या परंपरेमुळे अणदूरमध्ये श्रावण महिना हा केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरतो.
सुनील ढेपे, सचिव , श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग
मो - ७३८७९९४४११