G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

अणदूर ते नागझरी: एक अतूट श्रद्धेची परंपरा

 


अणदूरचे श्री खंडोबा मंदिर हे केवळ एक जागृत देवस्थान म्हणूनच नव्हे, तर एक अतूट श्रद्धेच्या आणि परंपरेच्या प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची ख्याती केवळ श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असल्यामुळेच नाही, तर येथे जपल्या जाणाऱ्या अनेक विधिपूर्वक परंपरांमुळेही आहे. त्यांपैकी एक म्हणजे श्रावण महिन्यात श्री खंडोबांना नागझरी येथील होमकुंडातील पाण्याने अभिषेक करण्याची प्रथा.


नागझरी हे मैलारपूर (नळदुर्ग) श्री खंडोबा मंदिराजवळच असलेल्या एका डोंगरात वसलेले आहे. येथील होमकुंडातील पाणी वर्षभर गरम राहते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या कुंडाचे पाणी १९७२ च्या भीषण दुष्काळातही आटले नव्हते, ही बाब या श्रद्धेला आणखी बळकटी देते.


अणदूरहून नागझरी हे अंतर जवळपास चार किलोमीटर आहे, नागझरीहून मैलारपूर (नळदुर्ग ) आणि नंतर अणदूर अशा प्रकारे, अणदूरच्या पुजारी रोहित बाळू मोकाशे आणि शुभम महेश मोकाशे  दररोज एकूण नऊ ते दहा किलोमीटर अंतर चालून कापतात. श्रावण महिन्याच्या प्रत्येक पहाटे, ते पाऊस-वाऱ्याची पर्वा न करता ही यात्रा करतात. त्यांच्या खांद्यावर कावड असते आणि त्या कावडीवर प्रत्येकी दोन अश्या एकूण चार घागरी असतात.


मैलारपूर (नळदुर्ग ) हून एकदा कावड हाती घेतली की ती खाली टेकवू नये, असाही एक कडक नियम आहे. या नियमामुळे ही यात्रा आणखीनच आव्हानात्मक बनते. तरीही, हे पुजारी अविरतपणे, श्रद्धेने आणि समर्पणाने ही परंपरा जपत आहेत. ते नागझरी येथे पोहोचतात, स्नान करतात आणि मग होमकुंडातील पाणी घागरीत भरतात. 


यानंतर हे पुजारी मैलारपूर (नळदुर्ग) श्री खंडोबा मंदिराकडे जातात. तेथे एक घागर महादेवाला अर्पण केली जाते आणि एका रिकाम्या घागरीत जवळच्या नदीचे पाणी भरून ते परत येतात. संपूर्ण श्रावण महिना हा त्यांचा दिनक्रम असाच चालू राहतो.


आजच्या सुपरफास्ट युगातही, जिथे प्रत्येक गोष्ट जलदगतीने होते, तिथे ही परंपरा अजूनही कायम आहे. चालत जाऊन, घागरींमध्ये पाणी आणण्याची ही पद्धत, आणि त्यातही कावड खाली न टेकवण्याचा नियम, हे केवळ एक धार्मिक विधी नसून, ती एक निष्ठा, श्रद्धा आणि परंपरेचे जतन करण्याचा एक मार्ग आहे.

आज नागपंचमीच्या निमित्ताने, आपण या परंपरेला आणि त्यामागील भक्तीभावाला  वंदन करूया. 


- सुनील ढेपे, सचिव , श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग 

मो - ७३८७९९४४११