G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

श्री खंडोबाचे अणदूरमध्ये आगमन

अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील पावणे दोन महिन्याचे वास्तव्य संपल्यानंतर श्री खंडोबाचे बुधवारी पहाटे अणदूरमध्ये वाजत गाजत आगमन झाले.आता खंडोबाचे सव्वा दहा महिने वास्तव्य अणदूरमध्ये राहणार आहे.
अणदूर आणि नळदुर्गच्या खंडोबाची मूर्ती चल असून, अणदूरमध्ये सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने असा मूर्ती ठेवण्याबाबत लेखी करार आहे.नळदुर्गची पौष पौर्णिमा महायात्रा संपल्यानंतर अष्टमी करून नवमीच्या पूजेला श्री खंडोबा अणदूरमध्ये येतो, त्याप्रमाणे मंगळवारी मध्यरात्री श्री खंडोबा नळदुर्गहून मार्गस्थ झाला होता.
मैलारपूरच्या श्री खंडोबा मंदिरात मंगळवारी रात्री 11 वाजता अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्याचे आगमन झाले, त्यानंतर सहभोजन झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात मानकऱ्याचा मानपान आणि सत्कार करण्यात आला, त्यानंतर मूर्ती नेण्याबाबत आणि आणण्याबाबत लेखी करार करण्यात आला. त्यानंतर म्हाळसा, हेगडी प्रधान, मार्तंड भेरव यांच्या मुर्त्या अणदूरकडे मार्गस्थ झाल्या, त्यानंतर श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीत घालून हलगीच्या तालावर वारू नाचवत अणदूरकडे मार्गस्थ झाली.
बुधवारी पहाटे चार वाजता पालखीचे वेशीत आगमन झाले, डॉल्बीच्या आवाजात श्री खंडोबाची गाणी, हलगीचा दणदणाट आणि बँडबाजा लावुन मिरवणूक निघाली, समोर फटाक्यांची आतषबाजी आणि वारूचे फटकारे यामुळे वातावरण भक्तिमय आणि प्रसन्नमय झाले होते.
देव परत येणार म्हणून समस्त अणदूरकरांनी भल्या पहाटे उठून आपल्या घरासमोर सडा टाकून रांगोळी काढली होती, तसेच गावातील सुवासिनी महिलांनी पंचारती ओवाळून देवाचे औक्षण केले,मिरवणूक जवळपास दोन तास चालली, पालखी पूर्व महाव्दारसमोर येतात गुरव - पुजारी समाजातील महिलांनी पंचारती ओवाळून देवाचे औक्षण केले, सकाळी सहा वाजता सर्व मूर्तीची अणदूरच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविकांना सुनीता ढेपे - बचाटे यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.