G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

श्री खंडोबाचे अणदूरहुन नळदुर्गमध्ये आगमन

नळदुर्ग: अणदूरची यात्रा पार पडल्यानंतर  श्री खंडोबाच्या मूर्तीचे अणदूर येथील मंदिरातून नळदुर्ग (मैलारपूर) येथील मंदिरात गुरुवारी (ता.28) पहाटे चार वाजता वाजत-गाजत पालखीतून आगमन झाले. यावेळी मूर्ती देवाणघेवाणीबाबत नळदुर्गचे मानकरी व अणदूरचे मानकरी यांच्यामध्ये पूर्वापार चालत आलेला लेखी करार झाला. नळदुर्गकरांनी मैलारपूर मंदिर मार्गावर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या.

अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही गावात चार किलोमीटर अंतर आहे. या दोन्ही गावात श्री खंडोबाची मंदिरे असली तरी मूर्ती मात्र एकच आहे. श्री खंडोबाची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते. अणदूरहुन नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात मूर्ती नेण्या - आणण्याचा लेखी करार केला जातो. राज्यातील नव्हे देशातील हे एकमेव उदाहरण आहे.

मानकऱ्यांमध्ये लेखी करार
श्री खंडोबा व बाणाईचा विवाह नळदुर्ग येथे झाल्याची आख्यायिका असल्यामुळे नळदुर्ग (मैलारपूर) हे खंडोबाच्या भाविकांसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे.  अणदूर येथील यात्रा बुधवारी (ता. 27) मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली. बुधवारी रात्री छबिन्याची सांगता होऊन नळदुर्गच्या मानकऱ्यांचे आगमन झाले. अणदूर व नळदुर्ग या दोन्ही गावांच्या मानकऱ्यांमध्ये देवाची मूर्ती नेण्याचा, तसेच आणण्याचा लेखी करार करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मूर्ती नळदुर्गकडे मार्गस्थ झाल्या.

विधिवत पूजा करून मूर्तींची प्रतिष्ठापना
गुरुवारी पहाटे तीन वाजता श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीतून नळदुर्गकडे मार्गस्थ झाली. पहाटे पाच वाजता मैलारपूर-नळदुर्गमध्ये आगमन झाले. त्यानंतर विधिवत पूजा करून सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील पावणे  दोन महिने श्री खंडोबा मूर्ती मैलारपूर येथे वास्तव्यास असणार आहे. पौष पौर्णिमेस (10 व 11 जानेवारी) यात्रोत्सव साजरा होणार आहे. या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.


अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा २७ नोव्हेंबर रोजी

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा येत्या २७  नोव्हेंबर रोजी भरत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून यात्रेची जय्यत करण्‍यात येत आहे. 

अणदूरच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ .३० वाजता श्री खंडोबाची महापूजा होईल. दिवसभर भंडारा - खोबरे उधळणे, महानैवेद्य दाखवणे आदी कार्यक्रम पार पडतील. रात्री दहा वाजता श्रीचा छबीना - मिरवणुक काढण्यात येईल. रात्री १२ वाजता नळदुर्गच्या मानकर्यांचे आगमन, त्यानंतर मानपानाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अणदूर-मैलारपूर(नळदुर्ग) च्या मानकर्यांत खंडोबाची मूळ मूर्ती नेणे व आणण्याचा लेखी करार होईल. मध्यरात्री २.३० वाजता खंडोबाच्या मूर्तीच्या पालखीचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल. पहाटे ५ वाजता मैलारपूर (नळदुर्ग) मंदिरात खंडोबाचे आगमन नंतर विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.
 
अणदूरच्या यात्रेनिमित्त श्री. खंडोबाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. श्री खंडोबा मंदिर समिती व श्री खंडोबा यात्रा कमिटी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहे.
 
श्री खंडोबा आणि बाणाई विवाहस्थळ
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८  प्रमुख ठिकाणे आहेत, पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता म्हणून या स्थानाला अन्यन्यसाधारण महत्व आहे,  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार कि.मी. आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. अणदूरच्या यात्रेनंतर खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होणार आहे.
 
२८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा आखाडा
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा भव्य आखाडा भरणार आहे, या आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत पैलवान हजेरी लावणार असून, ११ हजार ते ५१ हजार बक्षिस ठेवण्यात आले आहे, त्याची जय्यत तयारी सुरु आहे, 
 
 

सुपरफास्ट युगातही कावडीने पाणी आणण्याची प्रथा कायम

अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रसिध्द देवस्थान श्री खंडोबास संपूर्ण श्रावण महिन्यात नळदुर्गच्या नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरीचे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे आणण्यात येते.सध्याच्या सुपरफास्ट युगात कावडीने पाणी आणण्याची ही प्रथा अजूनही कायम आहे.यंदाचा मान पुजारी अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आला आहे.


नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नळ आणि दमयंती हे राजा - राणी राहत होते.दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा आदीमैलारहून नळदुर्गात प्रकट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी बाणाईस चंदनपुरीहून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीस प्रस्थान केले,ही अख्यायिका प्रसिध्द आहे.नंतर नळ राजाने नळदुर्गजवळील बोरी नदीजवळ मंदिर बांधून श्री खंडोबाच्या स्वयंभू मुर्तीची प्रतिष्ठापणा केली.श्री खंडोबाची स्वयंभू मुर्ती नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरूजाजवळ सापडली आहे.

कालांतराने श्री खंडोबाचे मंदिर अणदूर येथे बांधण्यात आले.नंतर अणदूर आणि नळदुर्गच्या ग्रामस्थात करार होवून श्री खंडोबाची मुर्ती नेण्या आणण्याचा करार झाला.अणदूर आणि नळदुर्ग हे अंतर चार ते साडेचार किलोमीटर आहे.श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावने दोन महिने वास्तव्य असते.दोन्ही ठिकाणी स्वतंत्र मंदिरे असून,देव मात्र एकच आहे.

आगळी वेगळी प्रथा
श्री खंडोबाचे वर्षभर अनेक यात्रा उत्सव असतात.श्रावण महिन्यात एक आगळीवेगळी प्रथा आहे.श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे.श्री खंडोबाच्या मुर्तीखाली महादेवाची पिंड अस्तीत्वात आहे.या पिंडीस आणि श्री खंडोबाच्या मुर्तीस श्रावण महिन्यात नागझरीच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरी हे मैलारपूर (नळदुर्ग) मंदिराच्या जवळ डोंगर कपारीत आहे.तेथून हे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे भल्या पहाटे आणण्यात येते.

कुठे आहे नागझरी ?
मैलारपूर मंदिरापासून वसंतनगर जाणा-या रस्त्यावर कॅनॉलच्या दक्षिण बाजूस उंच
डोंगरावर नागझरी झरा आहे.या ठिकाणी एक कुंड आहे.या झ-याचे पाणी बारा महिने असते आणि विशेष म्हणजे ते गरम असते.गेली चार वर्षे उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ होता,परंतु या दुष्काळातही या झ-याचे पाणी वाहत होते.हे पाणी अत्यंत शुध्द आणि निर्मळ असून,ते गंगेचे पाणी असल्याची भाविकांची धारणा आहे.


 
असा असतो दिनक्रम
यंदाचा मान अणदूरच्या पुजारी समाजातील अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आलेला आहे.हे दोघे पाहटे तीन वाजता उठून अंघोळ करून धोतर (सोहळे)नेसून प्रत्येकी दोन घागरी (सोबत कावड) घेवून अनवाणी पायी (चप्पल न घालता) चालत निघतात.ते पहाटे चारपर्यंत नागझरीला पोहचतात.तेथे गेल्यानंतर परत अंघोळ करून प्रत्येकी दोन घागरी भरून कावडीने मैलारपूर मंदिरात जातात.तेथील मंदिरातील महादेवाच्या पिंडीस तांब्यातील पाणी घालून ते थेट अणदूरकडे प्रस्थान करतात.एकदा कावड उचलली की ती वाटेत कुठेही टेकावयाची नाही,असा नियम आहे.अणदूरच्या मंदिरात पहाटे साडेपाचपर्यंत ते पायी चालत पोहचतात.

मैलारपूर ते अणदूर हे अंतर चार किलोमीटर आहे.अंधा-या रात्री पावसाची तमा न बाळगता ही कावड आणली जाते.जाण्यायेण्याचे अंतर हे ९ किलोमीटर आहे.हे जिकरीचे काम अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे पार पाडत आहेत.कावडीने पाणी आणणे ही देवाची सेवा असून,ही सेवा करण्यात कसलेही कष्ट जाणवत नसल्याचे अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे सांगितले.
अणदूरच्या श्री खंडोबाची सकाळी ८ वाजता आणि रात्री ८ वाजता महापुजा होते.या दोन्ही वेळेस श्रावण महिन्यात श्री खंडोबाच्या मुर्तीस नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.इतरही महिन्यातही दोन वेळेस नित्यनियमाने पुजा होते,त्याचा मान माऊली मोकाशे यांना आहे.

खडी रविवार
श्रावण महिन्यात सर्व ठिकाणी सोमवारी उपवास केला जातो,परंतु अणदूरमध्ये रविवारी उपवास केला जातो आणि तो खडी उभा राहून केला जातो.श्री खंडोबाची सकाळी ९ वाजता पुजा आटोपली की,उपवास करणारे उभे राहतात,ते दिवसभर जेवण करत नाहीत,उभे राहूनच फराळ करतात.नंतर रात्रीची पुजा झाल्यानंतर प्रदक्षिणा संपल्यानंतर बसतात.तब्बल बारा तास उभे राहून हा उपवास केला जातो.यास खडी रविवार म्हटला जातो.किमान दीडशे ते दोनशे लोक खडी रविवारचा उपवास करतात.त्याचबरोबर रात्रीच्या पुजेच्या वेळी पुजारी समाजातील प्रत्येक घरातून एका व्यक्तीने सोहळ्यामध्ये येवून श्री खंडोबास पुजेच्या वेळी १०१ बेलपत्र घालण्याची प्रथा आहे.ही प्रथा आजही कायम आहे.

अनादी कालापासून प्रथा
अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी कावडीने आणण्याची प्रथा अनादी कालापासून सुरू आहे.ही प्रथा सध्याच्या सुपरफास्ट युगातही कायम ठेवण्यात आली आहे,असे श्री खंडोबा मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी सांगितले.