चंपाषष्ठी रोजी मल्हारी
मार्तंड तथा श्री खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसाचा वध करून जनतेचे आणि
ऋषीचे रक्षण केले होते. म्हणून चंपाषष्ठी सणाला महत्व आहे.
देव
दीपावली रोजी श्री महादेवाने खंडोबाचा अवतार धारण केला आणि चंपाषष्ठी रोजी
राक्षसाचा वध केला अशी आख्यायिका आहे. देव दीपावली रोजी ( १९ नोव्हेंबर )
अणदूरची यात्रा पार पडली तर चंपाषष्ठी उत्सव मैलारपूर ( नळदुर्ग) येथे होत
आहे. या दिवशी श्री खंडोबाचे दर्शन घेणे अत्यंत पवित्र मानले जाते. मैलारपूर ( नळदुर्ग) येथे आता दर रविवारी यात्रा भरणार आहे. पहिल्या रविवारी किमान २५ हजार भाविक दर्शन घेतात.जसे रविवार वाढत जातात तशी गर्दी वाढत जाते. तिसऱ्या रविवारपासून किमान ५० हजार ते १ लाख भाविक येतात. पुढे लाखाच्या पुढे भाविक येतात.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे दर रविवारी मंदिर समितीच्या वतीने मोफत अन्नदान केले जाते. त्याचा लाभ हजारो भाविक घेत असतात. देणाऱ्याचे हात हजार, झोळी माझी फाटकी याप्रमाणे दान देणारे अनेक आहेत.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे मंदिर समिती आणि शासनाच्या वतीने अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. बोरी नदीला पायऱ्या, सांस्कृतिक सभागृह, भाविकांसाठी खोल्या बांधण्यात आल्या आहेत. मंदिराचे रंगकाम करण्यात आले आहे. यंदा आणखी विकास काम पार पडतील, भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून लाकडी आणि लोखंडी बॅरेट तयार करण्यात आले आहेत.
घोडे,
पालखी यांचे मानकरी वेगळे आहेत. वाघ्या- मुरळी अनेक आहेत. मंदिरावर भंडारा
आणि खोबरे उधळण्याची परंपरा आहे. येथे पशु हत्येला बंदी आहे. पुरण - पोळीचा
नेवेध दाखवला जातो. बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत सोबत पातीचा कांदा
हे खंडोबाचे आवडते जेवण आहे.
जुन्या काळात
जेव्हा वाहनांची व्यवस्था नव्हती, तेव्हा मैलारपूर ( नळदुर्ग) येथे किमान
७०० ते १५०० बैलगाड्या येत होत्या. किमान सात दिवस यात्रा चालत असे. काळ
बदलला आणि त्याची जागा मोटारसायकल, जीप,कार, टमटम, टेम्पो, ट्र्क यांनी
घेतली . यात्रेत किमान ५ किलोमीटर अंतर गर्दी दिसते. यात्रा पळती
झाली.जेव्हा वीज नव्हती तेव्हा मशाली पेटवल्या जात होत्या. आता त्याची जागा
मर्क्युरी लाइट घेतली आहे.
विद्युत रोषणाईने मंदिर उजाळून निघते. शोभेचे दारूकाम केले जाते. यात्रेत रंगी बेरंगी शोभेची दारू उडवली जाते.
- सुनील ढेपे
7387994411