श्री खंडोबा,अणदूर मंदिरात दर रविवारी अन्नदान सुरु आहे. भाविकांनी सढळ हातानी मदत करावी, ही विनंती.

नळदुर्गच्या खंडोबा मंदिराचे स्थलांतरे

नळ राजाने नळदुर्ग मध्ये रणमंडल नावाचा किल्ला बांधला..याच नळदुर्ग किल्लातील हे आहे श्री खंडोबाचे पहिले मंदिर !
इब्राहिम आदिलशाहने हे मंदिर पाडून येथे उपली बुरुज बांधला, त्यानंतर नळदुर्गपासून दोन किलोमीटर अंतरावर बोरी नदीच्या काठी मंदिर बांधण्यात आले, मात्र या मंदिरात गायीची हत्या केल्यामुळे मंदिर चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अणदूरमध्ये बांधण्यात आले, छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराच्या देखभालीसाठी 500 एकर जमीन दान केली, नंतर अहिल्याबाई होळकर यांनी सभामंडप बांधला, म्हणून अणदूरचे मंदिर तीन टप्प्यात झाल्याचे दिसते,
पुढे नळदुर्ग आणि अणदूरमध्ये देवाच्या मूर्तीसाठी वाद सुरू झाला, त्यानंतर अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने देवाची मूर्ती ठेवण्याचा करार झाला, तो करार आजही पाळला जातो..
नळदुर्गचे नवे मंदिर बोरी नदीच्या काठावर जुन्या मंदिराच्या 500 मीटर दूर बांधण्यात आले, ते कोरपे नावाच्या भक्तांने बांधले, असा दाखला मिळाला आहे. हे मंदिर बिनशिखराचे होते,सध्याच्या मंदिर समितीचे त्यावर शिखर बांधून रंगरंगोटी केली...

अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही मंदिराचे पुजारी एकच असून, ट्रस्ट सुध्दा एकच आहे..
सदानंद आणि होनकळस मोकाशे हे श्री खंडोबाचे मूळ पुजारी, त्यांचे वंशज सध्या पुजारी आहेत, मोकाशेनंतर ढेपे, ढोबळे, येळकोटे, हराळे ही पोटआडनाव पडली आहेत.अणदूरमध्ये दररोज एक पुजारी त्यांच्या हिस्साप्रमाणे बदलतात, नळदुर्गमध्ये मात्र पावणेदोन महिने चार पुजारी एकच असतात, मात्र देव अणदूरला गेल्यानंतर तेथेही हिस्साप्रमाणे रोज पुजारी बदलतात...
जेव्हा देवाची मूर्ती अणदूरला असते तेंव्हा नळदुर्गच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते, तर मूर्ती नळदुर्गला असताना अणदूरच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते...
श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग दिसते...
श्री खंडोबाची मूर्तीही एक शिवलिंग असून, त्यावर हळदी चा लेप लावून नाक, डोळे बसविले जातात, त्यावर चांदीचा किरीट चढवला जातो, सकाळ आणि रात्री दोन वेळा सोहळ्यात पूजा केली जाते...रात्री शेजारती म्हटली जाते. .
दोन्ही पूजेच्या वेळी नगारा वाजवला जातो, तो मान मुस्लिम भक्त याकूब शेख कडे आहे, पूर्वी अनेक वर्षे आणखी एक मुस्लिम भक्त बाबू पिंजारी दररोज मंदिरात फुले आणून देत होते...
श्री खंडोबाचे अणदूर आणि नळदुर्गमध्ये वेगवेगळे मानकरी आहेत, यात्रा कमिटी वेगळी आहे...
अणदूर यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवला जातो, नळदुर्ग यात्रेनंतरही कुस्त्यांची स्पर्धा होते...
देव नळदुर्गमध्ये आल्यानंतर दर रविवारी यात्रा तर पौष पौर्णिमेला महायात्रा असते...
- सुनील ढेपे
पुजारी आणि मंदिर समिती सचिव
अणदूर - नळदुर्ग मंदिर
9420477111

चंपाषष्ठी उत्सव आणि मैलारपूर !


चंपाषष्ठी रोजी मल्हारी मार्तंड तथा श्री खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसाचा वध करून जनतेचे आणि ऋषीचे रक्षण केले होते. म्हणून  चंपाषष्ठी सणाला महत्व आहे.
देव दीपावली रोजी श्री महादेवाने  खंडोबाचा अवतार धारण केला आणि चंपाषष्ठी रोजी राक्षसाचा वध केला अशी आख्यायिका आहे. देव दीपावली रोजी ( १९ नोव्हेंबर ) अणदूरची यात्रा पार पडली तर चंपाषष्ठी उत्सव मैलारपूर ( नळदुर्ग) येथे होत आहे. या दिवशी श्री खंडोबाचे दर्शन घेणे अत्यंत पवित्र मानले जाते.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे आता दर रविवारी यात्रा भरणार आहे. पहिल्या रविवारी किमान २५ हजार भाविक दर्शन घेतात.जसे रविवार वाढत जातात तशी गर्दी वाढत जाते. तिसऱ्या रविवारपासून किमान ५० हजार ते १ लाख भाविक येतात. पुढे लाखाच्या पुढे भाविक येतात.
२ जानेवारी २०१८ रोजी महायात्रा आहे. या दिवशी पौष पौर्णिमा आहे. यंदा ३१ डिसेंबर रोजी रविवार, १ जानेवारी रोजी अर्धी पौर्णिमा, २ जानेवारी रोजी पौर्णिमा समाप्ती आहे.त्यामुळे ३१ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत किमान १० लाख भाविक दर्शन घेतील, असा अंदाज  आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे दर रविवारी मंदिर समितीच्या वतीने मोफत अन्नदान केले जाते. त्याचा लाभ हजारो भाविक घेत असतात. देणाऱ्याचे हात हजार, झोळी माझी फाटकी याप्रमाणे दान देणारे अनेक आहेत.
यंदा पाऊस चांगला झाल्याने पिके चांगली आली आहेत. बोरी धरणाला पाणी ओव्हर फ्लो आहे. बोरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे भाविक आनंदी आहेत . जवळच  भुईकोट किल्ला आणि खंडोबाचे दर्शन असा दुग्ध शर्करा योग आहे. मैलारपूर ( नळदुर्ग) क्षेत्र तुळजापूर पासून 35 किलोमीटर आणि सोलापूर पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे मंदिर समिती आणि शासनाच्या वतीने अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. बोरी नदीला पायऱ्या, सांस्कृतिक सभागृह, भाविकांसाठी खोल्या बांधण्यात आल्या  आहेत. मंदिराचे रंगकाम करण्यात आले आहे. यंदा आणखी विकास काम पार पडतील, भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून लाकडी आणि लोखंडी बॅरेट  तयार करण्यात आले आहेत.

आख्यायिका
श्री खंडोबा बाणाईसाठी चंदनपुरी ( नाशिक) येथे बारा वर्ष मेंढपाळ म्हणून राहिला,बारा वर्षानंतर जेव्हा श्री खंडोबा मूळ अवतारात आला तेव्हा त्यांनी बाणाईस नळदुर्गमध्ये आणून विवाह केला. नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नळ -दमयंती राजा राणी राहत होते, दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रगट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी बाणाईशी नळदुर्मध्ये विवाह केला आणि नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले.
अणदूर आणि नळदुर्ग यात चार किलोमीटर अंतर आहे. दोन्ही गावात मंदिरे आहेत मात्र देव एकच आहे. श्री खंडोबा अणदूरमध्ये सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने मुक्कामास असतात, देव एका ठिकाणाहून  दुसऱ्या ठिकाणी नेताना कागदावर लेखी करार केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून ही  परंपरा सुरु आहे. दोन्ही गावात एकोपा आहे. दोन्ही गावचे वेगवेगळे  मानकरी आहेत.
घोडे, पालखी यांचे मानकरी वेगळे आहेत. वाघ्या- मुरळी अनेक आहेत. मंदिरावर भंडारा आणि खोबरे उधळण्याची परंपरा आहे. येथे पशु हत्येला बंदी आहे. पुरण - पोळीचा नेवेध दाखवला जातो. बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत सोबत पातीचा कांदा हे खंडोबाचे आवडते जेवण आहे.

जुन्या काळात जेव्हा वाहनांची व्यवस्था नव्हती, तेव्हा मैलारपूर ( नळदुर्ग) येथे किमान ७०० ते १५०० बैलगाड्या येत होत्या. किमान सात दिवस यात्रा चालत असे. काळ बदलला आणि त्याची जागा   मोटारसायकल, जीप,कार, टमटम, टेम्पो, ट्र्क यांनी घेतली . यात्रेत किमान ५ किलोमीटर अंतर गर्दी दिसते. यात्रा पळती झाली.जेव्हा वीज नव्हती तेव्हा मशाली पेटवल्या जात होत्या. आता त्याची जागा मर्क्युरी लाइट घेतली आहे.
विद्युत रोषणाईने मंदिर उजाळून निघते. शोभेचे दारूकाम केले जाते. यात्रेत रंगी बेरंगी शोभेची दारू उडवली जाते.

- सुनील ढेपे
7387994411


श्री खंडोबाचे नळदुर्गमध्ये आगमन

उस्मानाबाद - जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री खंडोबाचे अणदूरहुन नळदुर्गमध्ये सोमवारी पहाटे पाच वाजता वाजत गाजत पालखीतुन आगमन झाले. 10 जानेवारी 2018 पर्यंत श्री खंडोबाचे नळदुर्गमध्ये वास्तव्य राहणार आहे.
अणदूरची यात्रा रविवारी मोठया भक्तिभावाने आणि धार्मिक कार्यक्रमानी पार पडली.दिवसभर विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर श्रीचा रात्री 10 वाजता वाजत गाजत छबिना काढण्यात आला. रात्री साडेबारा वाजता छबिण्याची सांगता झाली.
याचवेळी नळदुर्गच्या मानकऱ्याचे आगमन झाले. त्यानंतर पानसुपारी कार्यक्रम पार पडला, त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्याचा सत्कार करण्यात आला आणि दोन्ही गावाच्या मानकऱ्यामध्ये देवाच्या मुर्त्या नेण्याचा आणि आणण्याचा लेखी करार करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मुर्त्या नळदुर्गकडे मार्गस्थ झाल्या, त्यानंतर पहाटे तीन वाजता श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीत घालण्यात आली आणि नळदुर्गकडे मार्गस्थ झाली.
पहाटे पाच वाजता सर्व मूर्त्याचे मैलारपूर - नळदुर्गमध्ये आगमन झाले,त्यानंतर विधिवत पूजा करून सर्व मुर्त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

नळदुर्गच्या भुईकोट किल्यात श्री खंडोबाची स्वयंभू मूर्ती सापडली असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दोन वेळेस पूजा केली जाते, श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्गमध्ये झाल्याने या मंदिराला जेजुरी इतके महत्व आहे.