नळदुर्ग व अणदूर ही दोन गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत, या दोन ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, अणदूर येथे खंडोबा वर्षातील सव्वा दहा महिने व नळदुर्ग येथे पावणे दोन महिने वास्तव्य करतात असे मानले जाते, या मुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते. अणदूर चे मुळ नाव आनंदपूर होते त्याचे पुढे अणदूर झाले. नळदुर्गला प्राचीन इतिहास आहे ईस १०४२ चे दरम्यान कल्याणीचे चालुक्य राज्याचा मांडलिक राजा नळ याचे हे राजधानीचे ठिकाण या नळराज्याने येथे रणमंडल नावाचा किल्ला बांधला तो पुढे नळदुर्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आणि किल्ल्या जवळ लोकवस्ती होऊन नळदुर्ग गाव अस्तित्वात आले. अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभुमि असणारी ही भुमि इतिहासाच्या पाउल खुणा घेउन नांदत आहे.
नळदुर्ग उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद - सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासुन 55 किमी व सोलापूर पासुन 40 किमी अंतरावर आहे महामार्गावरून कडेला दिसतो तो नळदुर्ग किल्ला या किल्ल्या मधील दूर वरून नजरेत भरणारी वास्तु म्हणजे उपरी अथवा उपली बुरुज
हा बुरुज टेहाळणी व तोफांचा मारा करण्यासाठी बांधण्यात आला होता याच ठिकाणी प्रथम खंडोबाचे मंदिर होते येथील नळराजा [ ईस १०४२ ] ची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती तिचे भक्ती मुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले त्यावेळी हे ठिकाण नळराज्याचे रणमंडल या किल्लाचे बाहेर होते या ठिकाणी नळराज्याने खंडोबाचे मंदिर बांधले होते. ईस १६९४ मध्ये इब्राहीम आदिलशहाने येथे किल्ला बांधताना खंडोबा मंदिराचे जागेवरच उपरी बुरुज बांधला आणि हे मंदिर नष्ट झाले. बुरुजाचे पायऱ्या ज्या ठिकाणी मिळतात तेथे तळाशी असणारे पूर्वाभिमुख कोनाड्यात त्याची स्मृती म्हणून आजही लोक एका एका ओबड धोबड मूर्तीला लोक भंडारा वाहतात
पुढे पुन्हा खंडोबाची स्थापना व यात्रा सुरु करण्याचा प्रयत्न झाला, बादशाहने फर्मान काढले आणि किल्ल्याचे उत्तर तटाचे बुरुजाखाली दक्षिणाभिमुख कमानी पैकी पश्चिमेकडील कमानीत पूर्वाभिमुख ओटा बांधुन त्यावर खंडोबाची स्थापना करून यात्रा भरू लागली.
कालांतराने ग्रामस्थांनी बोरीनदी किनारी गावाचे वायव्येस खंडोबा मंदिर बांधले पण तेथेही काही अडचणी निर्माण झाले मुळे नळदुर्गचे उत्तरेस २.५ किमी अंतरावर खंडोबाचे हे मंदिर उभारण्यात आले. नळदुर्ग गावाचे पश्चिमेस महामार्गावर उतार दिशेस जाणारा रस्ता मिळतो या रस्त्याने सुमारे १ किमी अंतरावर गेल्यावर आजचे प्रचलित मंदिर दिसते तेथून पूर्वेकडे सुमारे १ किमी अंतरावर हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. हे मंदिर तिघई असुन प्रथम चार कमानी सोपा आहे गर्भगृहात एका कट्यावर सयोनी लिंग आहे. मंदिरावर वीट बांधकामाचे शिखर आहे, या मंदिरा मध्ये गाय मारल्याने देव अणदूर मध्ये जाऊन राहिला अशी दंतकथा आहे. ही घटना १७ व्या शतकाचे उत्तरार्धात घडल्याचे सांगतात आज हे मंदिर परितक्त्य अवस्तेत आहे.नंतर या मंदिराचे वायव्य दिशेस एक दगडी चोथरा आहे या चोथर्यावर यात्रेच्या वेळी देव अणदूर मधून आणून त्याची हंगामी स्थापना करून यात्रा उत्सव साजरा होऊ लागला.
या चोथऱ्याचे पश्चिमेस सुमारे १ किमी अंतरावर आजचे प्रचलित मंदिर आहे हे मंदिर उत्तराभिमुख असुन दगडी बांधकामातील या मंदिराची रचना तीन कमानी मंडप व गर्भगृह अशी आहे. कोरपे आडनावाचे भक्ताने बांधलेले मंदिर शिखर विरहित होते अलीकडे शिखराचे बांधकाम करण्यात आले आहे . गर्भगृहात एका चोथर्यावरसयोनी लिंग आहे मंदिराचे समोर कमान व त्यावर नगारखाना आहे. मंदिराचे उत्तरे कडून बोरी नदी वाहते.अणदूर नळदुर्ग मधून महामार्गाने सोलापूर कडे जाताना ४.५ किमी वर दक्षिणेकडे अणदूर कडे जाणारा रस्ता लागतो
या रस्त्याने आपण १ किमी अंतरावर मंदिराचे प्रवेशद्वारात पोहोचतो. हे मंदिर उत्तर्भिमुख असुन तट बंदीने युक्त आहे तटाची उंची ३५ फुट असुन पुर्व पश्चिम लांबी १९० तर दक्षिण उत्तर लांबी १०५ फुट आहे, तटबंदी चे ओवारीवर व दरवाज्यावर ईस १७४६ व १७४९ चे शिलालेख आहेत या वरून या तटबंदीचे काम या काळी झालेचे स्पष्ट होते.
उत्तर दरवाज्याने प्रवेश केल्यावर समोरच नदी मंडप लागतो तो खांबावर आधारलेला आहे याचे पुर्व, पश्चिम,उत्तर दिशांना अंगास बसण्यासाठी कट्टे असुन तीनही दिशेकडून रस्ते आहेंत या मंडपावर शिलालेख आहे या वरून या मंदिराचे काम ईस १७३९ मध्ये झाल्याचे दिसते.या मंडपाचे दक्षिणेस मुख मंडप असुन या मंडपात पश्चिम बाजुस देवाचे शेजघर. व पुर्वबाजुस जामदारखाना आहे.मंडपाचे दक्षिणेस उत्तराभिमुख गर्भगृह असुन गर्भगृहात आसनावर खंडोबाचे सयानी लिंग आहे या लिंगावर मुखवटा चढवुन सजावट केलेली असते यावर धातूची मेघदंम्बरी असुन मागील बाजुस प्रभावळ आहे मेघदंम्बरीचे दानही बाजुस खंडोबा म्हाळसा यांचे उभ्या मुर्ती आहेत .मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर पश्चिम बाजुस एक उत्तराभिमुख देवडी असुन त्यात नरसिह मुर्ती आहे .आवाराचे वायव्य कोपऱ्यात एक पार असुन पारावर शिवलिंग, उभा सूर्य , बैठी शिवपार्वती व गणेश मुर्ती आहेत ही शिल्पे व नरसिह अणदूर जवळील नारायणगुडी नावाच्या उधवस्त मंदिरातील असल्याचे सांगतात.मंदिराचे आवाराचे बाहेर पश्चिम बाजुस खंडोबाचे जुने मंदिर होते नळदुर्ग मधून खंडोबा येथे आणलेवर प्रथम त्याची स्थपना करून बांधलेले हे मंदिर इंदाई चे मंदिर ओळखले जात होते एका प्राकारात उंच चबुतरा त्यावर तीनकमानी पूर्वाभिमुख सोपा व पश्चिमेस गाभारा व त्यामध्ये सयोनी लिंग अशी त्याची रचना होते आज मात्र तेथे सभागृह बांधल्याचे ग्रामस्थ सांगतात .
नळदुर्ग किल्ला - हा किल्ला प्रथम कल्याणीचे चालुक्यचे मांडलिक असलेल्या नळ राज्याने [ईस १०४२] बांधला माती मध्ये बांधलेला ह्या किल्याचे ईस १३६१ ते१४८० मध्ये बहामनी काळात दगडामध्ये पुनबांधणी करण्यात आली. हा किल्ल्याचा भाग आजही रणमंडल म्हणून ओळखला जातो. आदिलशाही काळात यांचा विस्तार करण्यात आला. या किल्ल्या मधील पाणीमहल ही वास्तु १८५८ मध्ये उभी राहिली. बोरी नदीचे पाणी किल्ल्या कडे आणून त्यावर १७४ मी लांब अडीच ते चौदा मीटर रुंद व १९ मीटर उंचीचा बंधारा बांधुन यात पाणीमहल बांधण्यात आला. पावसाळ्यात बंधारा भरल्यावर वरील धबधबे वाहु लागतात गवाक्षा पुढून पाण्याचा पडदा सोडल्या सारखे दृश्य दिसते हा पाणीमहल, नवबुरुज [मांगिणी चा बुरुज] विशेष प्रेक्षणीय.
यात्रा - मार्गशीर्ष प्रतिपदेला अणदूर येथे मोठी यात्रा भरते रात्री देवाचा छबिना निघतो व पहाटे देव पालखीत नळदुर्ग कडे जाण्यासाठी प्रस्थान करतात चंपाषष्टी घटस्थापना व खंडोबा षडरात्र उत्सव नळदुर्ग मध्ये संपन्न होतात. मार्गशीर्ष प्रतिपदे पासुन पौष पौर्णिमे पर्यंत नळदुर्ग मध्ये मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते नळदुर्ग खंडोबा चा प्रमुख उत्सव पौष पौर्णिमेस देवाचा छबिना निघतो या मिरवणुकीत काठ्या व लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो पहाटे देव पालखीतून अणदूर कडे प्रस्थान करतात.