G-PZND2NBDJ8
अणदूर येथे श्री खंडोबाची यात्रा २ डिसेंबर रोजी / ३ डिसेंबर रोजी पहाटे 'श्री' चे नळदुर्गमध्ये आगमन .... श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

अणदूरच्या खंडोबाचा करार

आपण विविध करार वाचले असतील, मग ते देशांदेशात केलेले असो, एकाद्या संवेदनशिल विषयातील असो अथवा दररोजच्या व्यवहारातील असो...पण  एकाद्या देवाचा दरवर्षी लेखी करार केला जातो, हे  कोठे वाचले आहे का ?  निश्चितच नाही... पण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात एकाच ठिकाणी हा करार होतो, तेही उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर या ठिकाणी.
मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार घेतला.या अवतारांतील खंडोबाच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत.अणदूरच्या खंडोबाचीही अशीच अख्यायिका आहे.अणदूरपासून चार कि.मी.अंतरावर असलेल्या नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात नळ - दमयंती राजा - राणी राहात होते.दमयंती राणी श्री खंडोबाची निस्सीम भक्त होती.ती दररोज पहाटे उठून स्नान केल्यानंतर श्री खंडोबाच्या दर्शनासाठी आदि - मैलार ( कर्नाटक राज्यातील बीदर या शहरापासून आठ कि.मी.अंतरावर हे ठिकाण आहे) येथे जात होती.तेथे जाण्यासाठी किल्ला परिसरात एक वडाचे झाड मदत करीत होते, त्या झाडाच्या पारंब्यावर बसल्यानंतर हे झाड उडत असे व ते आदि - मैलारपर्यंत जात असे व दर्शन झाल्यानंतर परत हे झाड नळदुर्गला येत असे. नित्यनियमाने एक वर्षे सेवा केल्यानंतर नळ राजाला पहाटे जाग आली तर जवळ दमयंती राणी नव्हती.तोपर्यंत राजाला ही खबर नव्हती.राजाला संशय आला.दुस-या दिवशी त्याने गुपचूप राणीच्या पाठीमागे जावून तोही दुस-या बाजूला पारंब्यावर बसून आदि - मैलारला गेला. तेथे गेल्यावर नळ राजाला सर्व उलघडा झाला व त्याने खंडोबाची माफी मागून नळदुर्गला प्रगट होण्याची विनंती केली, श्री खंडोबाने तथास्तू म्हटले व किल्ल्यातील एक जागा सांगून तेथे आपण प्रकट होणार असल्याचे सुचित केले.नळ राजाने दुस-या दिवशी काही मजूर लावून खंडोबाने दर्शविलेली जागा उकरण्यास सुरूवात केली. ( ती जागा म्हणजे नळदुर्ग किल्ल्यातील उपल्या बुरूजामागील पाठीमागील भाग ) पाच ते सहा फूट खड्डा घेतल्यानंतर रक्ताची चिळकांडी बाहेर पडली. नंतर पाहिले तर एक स्वयंभू तांदळा (दगडाचा अंडाकृती भाग ) निघाला. तो राजाने मोठया भक्तीभावाने पुजला. नंतर किल्ल्यापासून काही अंतरावर श्री खंडोबाचे मंदिर बांधण्यात आले व या ठिकाणी श्री खंडोबाची विधीवत प्रतिष्ठापणा करण्यात आली. दमयंतीच्या भक्तीसाठीच श्री खंडोबा आदि - मैलारहून नळदुर्ग या ठिकाणी प्रगट झाले. राजा - राणीच्या निधनानंतर हजारो वर्षानंतर श्री खंडोबा मंदिरात कोणत्या तरी समाज कंटकाने गाय कापली, त्यामुळे  नळदुर्गचे मंदिर भ्रष्ट झाले.त्यामुळे श्री खंडोबा कोपला म्हणून त्या काळातील लोकांनी पाच कि.मी.अंतरावरील अंनंदऊर या ठिकाणी श्री खंडोबाचे मंदिर बांधले, व श्री खंडोबाचा तांदळा या ठिकाणी नेवून श्री खंडोबाची या ठिकाणी प्रतिष्ठापणा केली. त्याकाळचे अंनंदऊर म्हणजेच आजचे अणदूर होय.
अणदूरच्या श्री खंडोबा मंदिराच्या देखभालीसाठी कोल्हापरच्या शाहू महाराजांनी 500 एकर जमिन दान केली आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरासमोर सभागृह बांधले.त्यामुळे अणदूरचे मंदिर तीन वेगवेगळया भागात बांधल्याचे दिसून येते.काही वर्षानंतर नळदुर्गच्या लोकांनी खंडोबा आमचा आहे, असा वाद सुरू केला.या वादावर श्री खंडोबा अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर ( नळदुर्ग ) येथे पावणेदोन महिने ठेवण्याच्या तोडगा निघाला.त्यानुसार मैलारपूर येथे जुन्या मंदिराच्या पाचशे फुटाच्या अलिकडे नविन मंदिर मंदिर बांधण्यात आले व तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली.अनेक वर्षे लोटून गेल्यानंतरही ही प्रथा गुण्या - गोविंदाने सुरू आहे.
दिवसभर यात्रा पार पडल्यानंतर रात्री श्रीचा वाजत- गाजत छबिना काढला जातो.पहाटे दोन वाजता नळदुर्गच्या मानक-यांचे अगमन होते, त्या अगोदरच अणदूरचे मानकरी व ग्रामस्थ जमलेले असतात.दोन्ही गावांच्या मानक-यांत गळाभेट झाल्यानंतर चहा-पान केला जातो.नंतर एका साध्या कागदावर लेखी करार करून तो श्री खंडोबा देवाजवळ एका ताटात ठेवला जातो.त्याच्यावर भंडार टाकून तो मोठ्याने वाचण्यात येतो.आम्ही श्री खंडोबाची मुर्ती पावणे दोन महिन्याच्या वास्तव्यासाठी नळदुर्ग येथे नेत असून तेथील यात्रा पार पडल्यानंतर परत अणदूरला आणून देवू , असा त्यात उल्लेख असतो.नंतर मुख्य मानक-यांचा फेटा बांधून सत्कार केला जातो तर अन्य मानक-यांचा नारळ प्रसाद व फुलांचा तुरा देवून सत्कार केला जातो.त्यानंतर श्री खंडोबाची मुख्य मुर्ती एका पालखीत घालून वाजत - गाजत नळदुर्गला नेली जाते व नळदुर्गची यात्रा संपल्यानंतर वाजत - गाजत अणदूरला परत आणली जाते. हा सोहळा अणदूर - नळदुर्गच्या लोकांचे ऐक्याचे प्रतिक असून, डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.
अणदूर - मैलारपूरचे एकच पुजारी असून तेच दोन्ही ठिकाणचे पुजा - अर्चा करतात.श्री खंडोबा मंदिर समितीही एकच आहे.मंदिर समितीने भक्तांच्या देणग्यांवर दोन्ही ठिकाणच्या मंदिराचा जिर्णोध्दार केला आहे. मैलारपूर येथे दर्शन बारी, अन्नदानासाठी सभागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत तसेच  यात्राकाळात भाविकांना थांबण्यासाठी मंदिर परिसरातील खासगी शेतीही विकत घेतली आहे. मैलारपूर येथे दर रविवारी अन्नदान मोठया प्रमाणात केले जाते.पुर्वीपेक्षा मंदिर समितीने विकासाची कास धरली आहे.
* सुनील ढेपे
 मो.९४२०४७७१११
 dhepesm@gmail.com