पंचानन हय वाहन सूर भूषित निळा
मणी मल्ल मर्दूनी तो धूसर पिवळा
करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी
वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll १ ll
सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा
नाना नामे गाईल हि तुमची सेवा
अघटीत गुण गावया वाटतसे हेवा
फणीवर शिणला तेथे नर पामर केवा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी
वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll २ ll
रघुवरस्मरणी शंकर हृदयी निवाला
तो हा मल्लांतक अवतार झाला
यालागी आवडे भावे वर्णिला
रामी रामदास जिवलग भेटला
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी
वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll ३ ll
---- रामदास स्वामी