श्री खंडोबा,अणदूर मंदिरात दर रविवारी अन्नदान सुरु आहे. भाविकांनी सढळ हातानी मदत करावी, ही विनंती.

यात्रा वाढण्याचे कारण...

तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे.दोन्ही गावांत जेमतेम चार किलोमीटर अंतर. सोलापूर - हैद्राबाद हा नॅशनल हायवे चार पदरी होत असून,या दोन्ही गावापासून हा हायवे जात आहे.अणदूरला उड्डाण पूल तर नळदुर्गला बायपास करण्यात येत आहे.जो बायपास आहे,तो श्री खंडोबा मंदिरापासून जात आहे.येत्या दोन वर्षात त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर मैलारपूरच्या मंदिराला आणखी विशेष महत्व येणार आहे.
नळदुर्गचे श्री खंडोबा मंदिर बोरी नदीच्या काठावर बांधण्यात आले आहे.ते नळदुर्गपासून एक किलोमीटर अंतरावर आहे.या ठिकाणी लोकवस्ती नाही.श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूरमध्ये पावणे दोन महिने वास्तव्य असते.यात्रोत्सव मैलारपूरमध्ये श्रीची मुर्ती असताना असतो.दर रविवारी मोठी यात्रा भरते.सलग पाच रविवार झाल्यानंतर पौष पोर्णिमेला महायात्रा भरते.त्यानंतर एक रविवार होतो.अष्टमी करून नवमीला श्री खंडोबाचे अणदूरला प्रस्थान होते.गावे दोन,मंदिरे दोन पण देव एक आहे.दोन्ही मंदिराचे पुजारी एकच असून,ट्रस्ट एकच आहे.जेव्हा अणदूरहून मैलारपूरला आणि मैलारपूरहून अणदूरला देव नेला जातो,तेव्हा दोन्ही गावच्या मानक-यात एक लेखी करार केला जातो आणि मुर्तीची अदानप्रदान केली जाते.मुर्ती एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेताना वाजत गाजत पालखी काढली जाते.हा सोहळा अत्यंत धार्मिक आणि देखणा असतो.
श्री खंडोबा आणि बाणाईचा विवाह नळदुर्गमध्ये झालेला आहे.नळराजाची पत्नी दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रकट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी याठिकाणी बाणाईशी विवाह केला.श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे.महादेव म्हणजे खंडोबा आणि खंडोबा म्हणजे महादेव.महादेवाने मल्हारी मार्तंण्ड म्हणजे श्री खंडोबा अवतारामध्ये जयाद्रीशी विवाह करण्याचे वचन पार्वतीला दिले होते,त्यामुळे महादेवाने मल्हारी मार्तंण्ड अवतारात बाणाईशी विवाह केला.बाणाई म्हणजे जयाद्री आणि म्हाळसा म्हणजे पार्वती.हेगडी प्रधान म्हणजे विष्णु आहेत.मात्र दिलेल्या वचनाचा त्रास म्हाळसाला झाला.तिला ते सहन झाले नाही,त्यामुळे तिने खंडोबाला वृध्द होण्याचा श्राप दिला.त्यामुळेच श्री खंडोबाने चंदनपुरीत वृध्द होवून बाणाईच्या घरी मेंढपाळ म्हणून बारा वर्षे चाकरी केली.बारा वर्षानंतर म्हाळसाच्या श्रापातून मुक्ती मिळाल्यानंतर श्री खंडोबाने बाणाईला चंदनपुरीतून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले.त्यामुळेच या स्थानाला मोठे महत्व आहे.ही अख्यायिका फार कमी लोकांना माहीत होती.झी मराठीवरील जय मल्हार मालिकेमुळे ती लोकांसमोर आली.त्याची आम्ही भरपूर प्रसिध्दी केली.त्यामुळे यात्रा वाढली आहे.
श्री खंडोबाची पौष पोर्णिमा यात्रा यंदा रेकॉर्डब्रेक झाली.दर रविवारी मिनी यात्रा भरली.दुष्काळी परिस्थिती असतानाही भाविक मोठ्या संख्येने मैलारपुरात आले.अणदूरला गर्दी वाढली आहे.याचे श्रेय झी मराठीला आणि आम्ही केलेल्या प्रसिध्दीला आहे.
माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी मला साथ दिली,वृत्तपत्रात सर्व बातम्या आल्या.सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अनेकाजवळ पोहचलो.चॅनलवर कधी नव्हे बातम्या झळकल्या.त्याचा इम्पॅक्ट आला.यात्रा मोठी होणे आपली संस्कृती आहे.यानिमित्त लोकांना भेटता येते,रोजच्या कटकटीच्या आणि धावपळीच्या जीवनात कुठे तरी मनशांती लाभते.
श्री खंडोबाचा एक पुजारी,मंदिर समितीचा सचिव म्हणून भाविकांची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजले.जे जे करता येईल,ते करण्याचा प्रयत्न केला.भविष्यात अनेक योजना आहेत,त्या साकार झाल्यानंतर आपणास कळवण्यात येईलच...मैलारपूरची यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी दोन्ही गावचे मानकरी,यात्रा कमिटी,नागरिक,नळदुर्ग नगर परिषद,अणदूर ग्रामपंचायत,पुजारी मंडळ,पोलीस,प्रशासन,पत्रकार या सर्वाचे सहकार्य लाभले.त्या सर्वांचा आभारी आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरची तुळजाभवानीची यात्रा सर्वात मोठी भरते.त्यानंतर येरमाळ्याच्या येडेश्वरीचा नंबर लागतो.आता श्री खंडोबाची यात्राही मोठी होवू लागली आहे.तुळजापूरपासून मैलारपूर आणि अणदूर फक्त ३५ किलोमीटर आहे.सोलापूरपासून ४० किलोमीटर आहे.तुळजापूर,मैलारपूर - अणदूर आणि अक्लककोट हे एकाच मार्गावर आहेत.भाविकांना एकाच वेळी ही तिर्थयात्रा करता येवू शकते...
पुनश्च आभार...
# सुनील ढेपे 
 


9420477111