कोरोनाचा फटका : अणदूरच्या श्री खंडोबा यात्रेवर बंदी
प्रथेप्रमाणे ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये मूर्ती नळदुर्गला जाणार
अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा यात्रेला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. १५ डिसेंबर रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र प्रथेप्रमाणे श्री खंडोबाची मूर्ती ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये नळदुर्गला नेण्यात येणार आहे.
अणदूर आणि नळदुर्ग मध्ये श्री खंडोबाचे दोन वेगवेगळे मंदिर असून, श्री खंडोबाची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते.गेल्या सातशे वर्षापासून ही रूढी - परंपरा सुरु आहे. अणदूरची यात्रा झाली मूर्ती नळदुर्गला नेली जाते. यंदा १५ डिसेंबर रोजी अणदूरची यात्रा होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अणदूरची यात्रा रद्द करण्यात आली आहे. अणदूर आणि नळदुर्गचे प्रमुख मानकरी, विश्वस्त मंडळ, पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये लेखी करार करून मूर्ती नळदुर्गला नेण्यात येणार आहे, मात्र यात्रा होणार नाही., असे प्रशासनाने कळविले आहे.
मंदिर परिसरात प्रासादिक भांडार दुकाने लावण्यास तसेच हॉटेल, खेळणी दुकाने , पाळणे लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. यादिवशी भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
नळदुर्गच्या मंदिराची रंगरंगोटी सुरु
श्री खंडोबाचे १६ डिसेंबर रोजी पहाटे नळदुर्गच्या श्री खंडोबा मंदिरात आगमन होणार आहे. या मंदिराची सध्या रंगरंगोटी सुरु असून त्याचे काम अंतिम टप्पात आहे.