नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग (मैलारपूर) येथील जागृत देवस्थान श्री खंडोबा देवाचा यात्रोत्सव २ ते ४ जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात आणि उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याने नळदुर्ग परिसर सुवर्णमयी होण्यासाठी सज्ज झाला असून, या यात्रेसाठी सुमारे ५ ते ७ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
धार्मिक महत्त्व आणि परंपरा
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून महाराष्ट्रातील खंडोबाच्या एकूण १२ स्थानांपैकी नळदुर्गचे मैलारपूर हे दुसरे प्रमुख स्थान मानले जाते. विशेष म्हणजे श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह याच पवित्र ठिकाणी झाला, अशी आख्यायिका आहे. मागील दीड महिन्यांपासून येथे यात्रोत्सव सुरू असून, पौष पौर्णिमेच्या यात्रेने या उत्सवाची सांगता होणार आहे.
३ जानेवारीला यात्रेचा मुख्य दिवस
यात्रेचा मुख्य दिवस शनिवार , ३ जानेवारी रोजी असणार आहे. या दिवशी पहाटे देवाचा अभिषेक आणि महापूजा संपन्न होईल. दिवसभर भाविकांचे नवस फेडण्याचे कार्यक्रम, तसेच पारंपरिक वाघ्या-मुरळी नृत्य सादर केले जातील. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध गावांमधून येणाऱ्या जवळपास सातशे नंदीध्वज (काठ्या).
मध्यरात्रीचा नयनरम्य सोहळा
३ जानेवारीच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्ग येथील मानाच्या काठ्यांचे आगमन मंदिरात होईल. यावेळी होणारी आतषबाजी आणि शोभेच्या दारूचे काम पाहण्यासारखे असते. दोन्ही गावांच्या मानकऱ्यांचा सत्कार आणि वाजतगाजत निघणारा छबिना याने यात्रेची सांगता होईल. भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेले भक्तगण हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असते.
प्रशासकीय सज्जता
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थांनकडून दर्शन बारीची (रांग) व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा यशस्वी आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मंदिर समिती, यात्रा कमिटी आणि नळदुर्ग नगरपरिषद अहोरात्र मेहनत घेत आहेत.
