G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

मार्तंड भैरव अवतार कथा

कृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह, धर्माचरण, तपस्या व होमहवन आदी नित्यकर्मे आनंदात व्यतीत करीत होते.त्याच सुमारास मल्लासुर दैत्याने मणिचूल पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले,त्यांचे आश्रम नष्ट करून गायी वासरांचा वध केला ऋषी पत्नींची विटंबना केली.अशा रीतीने त्या नंदनवनाची वाताहत लावून मल्लासुर आपल्या दैत्यसेनेसह निघून गेला परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषी मुनींनी देवाचा धावा केला व नारद ऋषींच्या कथनाधारे दुर्वास शिष्य लवा ऋषींच्या अभिमंत्रित केलेल्या धवलगिरीच्या परीसरामध्ये आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी ठेवून इंद्र देवाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

इंद्र देवाकडे आपले दुःख व्यक्त करून अभय मागितले.तेव्हा देवेंद्राने मल्लासुर व मणीसूर दैत्य बंधूंना ब्रम्हदेवा कडून मिळालेला अजेयत्वाच्या वरदानाचा वृतांत कथन केला व आपली असमर्थता प्रदर्शित केली.त्याबरोबरच वैकुंठामध्ये जाऊन विष्णुंची मदत घेण्यासठी सुचविले,दुर्दैवाने विष्णुंकडूनही नकार मिळाला तदनंतर धर्मऋषी कैलासावर भगवान शंकर महादेवाची मदत घेण्यासाठी पोहोचले.ऋषीमुखातून मल्लासुर दैत्याचे दुर्वर्तन ऐकून भगवान शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपल्या जटा आपटल्या, त्याबरोबर त्या उर्जेतून एक महामारी उत्पन्न झाली तिला ऋषी मुनींनी घृत अर्थात तूप पाजून शांत केले म्हणून तिचे नाव घृतमारी असे पडले.मणी-मल्ल दैत्यांचा संहार करण्यासठी सुर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले.गळ्यात सर्पभूषणे,कानात कुंडले,हातात त्रिशूल,डमरू,खड्ग आणि पूर्णपात्र असे मार्तंड भैरव सपत्नीक नंदीवर आरूढ होवून , कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्त कोटि गणांसह धवलगिरीवर अवतरले.

या ठिकाणी सैन्याची व्यवस्था लावून युद्धासाठी प्रस्थान ठेवले म्हणून हा परिसर प्रस्थपीठ म्हणून ओळखला जावू लागला.मल्लासूराला दूतांकरवी हि वार्ता समजल्या नंतर त्याने शिवाचा उपहास केला परंतु प्रत्यक्ष देवसैन्य पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला.त्याने आपले धुरंधर योद्धे व दैत्य सेनेसह युद्धासाठी सिद्धता केली,दोन्ही सैन्ये समोरासमोर भिडताच घनघोर युद्धास सुरवात झाली.मार्तंड भैरवाच्या देव सेनेने राक्षसांची आघाडीची फळी कापून काढताच,मल्लासुराने खड्गदृष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले.कार्तिकस्वामीने त्याचा पराभव करून त्याला ठार केले.त्यानंतर येणा-या प्रत्येक दैत्याचा संहार देवसेनेकडून केला गेला यामध्ये उल्कांमुखाचा श्रीगणेशाने तर कुंतलोमाचा महानंदीने पराभव करून त्यांना ठार केले.

दैत्य सेनेचा पराभव पाहून मल्लासुर क्रोधिष्ठ झाला व त्याने आपला धाकटा भाऊ शूर योद्धा मणीसूराला रणांगणावर पाठविले, त्याचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरव स्वतः युद्धासाठी सज्ज झाले.सुरवातीच्या घणाघाती युद्धानंतर मार्तंड भैरवाने त्रिशूल व खड्ग आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले त्याच्या मस्तकावर पाय देवून त्याला चिरडणार तोच मार्तंडाच्या पदस्पर्शाने मणी दैत्याची मती फिरली व त्याने देवस्तुती करून इष्ट वरदान देण्याचे वचन घेतले, "प्रभो,तुझे चरणाखाली माझे शीर असावे तसेच माझे अश्वारूढ रूप तुझे सानिध्यात असावे". मणीसूराच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या मार्तंड भैरवाने मल्लासूरास जीवदान देण्याचे ठरविले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्रीविष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले.दुराग्रही व अहंकारी मल्लासूर दैत्याने श्री विष्णूंचा सलोखा मान्य केला नाही याउलट आपल्या प्रचंड सेनेचा व सहका-यांचा संहार पाहून क्रोधीत झालेल्या मल्लासुराने उन्मत्तपणे मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान दिले.

त्यावर देवसेनेतर्फे घृतमारी युद्धामध्ये उतरली या महाभयंकर शक्तीने दैत्य सेनेचा सुरुवातीचा तीव्र आवेग कमी केला. त्याबरोबरच मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले मल्लसुराशी सर्व शस्त्र व अस्त्रांसह महायुद्ध झाले.बराचवेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्लासूराने आपले सर्व कौशल्य पणाला लावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खड्ग हाती घेऊन त्याचा घाव वर्मी घातला व मल्लासूराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला त्याबरोबरच श्रेष्ठ अशी मानसपूजा हि आरंभिली, या सर्व प्रकाराने मार्तंड भैरव मनी संतोषले व त्याला वरदान मागण्यास सांगितले. यावर तो म्हणाला " हे प्रभो माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शीर सदैव आपल्या चरणतळी निरंतर असावे." मणीसूर व मल्लासूर दैत्यांना पाताळात धाडल्या नंतर मार्तंड भैरावांनी 'प्रस्थपीठ' जवळील टेकडीवर आपली राजधानी स्थापन केली. दैत्यांवरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला 'जयाद्री' नाम मिळाले.दैत्यासूरांचा संहार करण्यासाठी खड्ग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा तर म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकांत भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद

श्री खंडोबा कँलेडरचे थाटात प्रकाशन

नळदुर्ग - श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री खंडोबा कँलेडरचे प्रकाशन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील - दुधगावकर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी मंदिर समितीच्या कार्यालयात करण्यात आले.
श्री खंडोबा देवस्थानने यावर्षी प्रथमच श्री खंडोबाचे छायाचित्र आणि माहिती असलेले १५ बाय २० आकाराचे कँलेडर प्रसिध्द केले आहे.या कँलेडरचे प्रकाशन एका छोट्याच्या समारंभात करण्यात आले.यावेळी उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य,ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मोकाशे, उपाध्यक्ष दिलीप शिवराम मोकाशे, सचिव सुनील ढेपे, सदस्य अशोक मोकाशे, दिलीप गोविंदराव मोकाशे, मराठवाडा लाइव्हचे संपादक सुनील बनसोडे आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत सुधाकर ढेपे,प्रकाश ढोबळे,रमेश मोकाशे आदींनी केले.
यावेळी संजय पाटील - दुधगावकर आणि राजाभाऊ वैद्य यांचा शाल,श्रीफळ, खंडोबाचा फोटो देवून आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भाषणात सचिव सुनील ढेपे यांनी ट्रस्टने केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील यांनी यात्रेच्या दिवशी पाणी टंचाई भासू देणार नाही, तसेच मंदिराच्या विकास कामासाठी हातभार लावू,असे आश्वासन दिले.शेवटी उपस्थितांचे आभार अध्यक्ष प्रकाश मोकाशे यांनी मानले.

Khandoba Info (Kannad)


खंडोबाचा करार


लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची यात्रा सुरळीत

नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडली.गेल्या तीन दिवसांत दहा लाखाहुन अधिक भाविकांनी रांगेत आणि शिस्तीत दर्शन घेतले. यात्रेनिमित्त श्री खंडोबाचा वाजत - गाजत छबिना काढण्यात आला तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
मैलारपूरचा श्री खंडोबा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. यात्रेसाठी किमान पाच लाख भाविक येत असतात.यंदा मात्र रेकॉर्ड ब्रेक यात्रा पार पडली. श्री खंडोबाची यात्रा पौष पोर्णिमेला पार पडत असते. यंदा रविवार व सोमवार सलग दोन दिवस पोर्णिमा आल्याने रविवारी पहाटे पासूनच भाविकांची मोठी रांग लागली. रविवार,सोमवार तसेच मंगळवार असे तीन दिवस सलग रांग चालू होती.
यात्रेसाठी श्री खंडोबा मंदिराचा भोवतालचा संपूर्ण माळराण भाविकांनी फुलून गेले होते. जिकडे - तिकडे वाहनांची तसेच माणसांची गर्दी दिसून आली.यात्रेसाठी विविध ठिकाणाहून सातशेहून अधिक नंदीध्वजाचे (काठ्यांचे )आगमन झाले होते.भाविकांना अंगोळीसाठी बोरी नदीच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.तसेच नदीच्या घाटावरही भाविकांनी अंगोळ करून, श्री खंडोबाचे दर्शन घेतले.तसेच काही भाविकांनी दंडवत घालत आपला नवस पुर्ण केला.भंडारा तसेच खोबरे उधळून येळकोट, येळकोट जयघोष केला. भाविकांनी उधळलेल्या भंडा-यामुळे मंदिर परिसर पिवळा झाला होता.भाविकही भंडा-यांने न्हाहून निघाले होते.
श्री खंडोबाला पुरण - पोळीचा नैवेद्य चालतो.भाविकांनी आपापल्या नेमूण दिलेल्या ठिकाणी चूल मांडून स्वयपाक केला तसेच नैवेद्य पण तयार करून श्री खंडोबा नैवैद्य दाखविला.तसेच श्रीफळ फोडून तसेच चांदीचे तसेच पितळ्याचे घोडे वाहून नवस पुर्ण केला.
दर्शनासाठी श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने दर्शन बारी तयार करण्यात आली होती.त्यामुळे भाविकांनी रांगेत तसेच शिस्तीस दर्शन घेतले.तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी मंदिर उजाळून निघाले होते.दर्शन झाल्यानंतर बच्चे कंपनीसाठी पाळणे, खेळणी तसेच करमणुकीचे साधने असल्यामुळे भाविकांनी त्याचा आनंद लुटला.
वाजत - गाजत छबिना
सोमवारी मध्यरात्री बारा वाजता नळदुर्गच्या मानाच्या नंदीध्वजाचे आगमन झाले.त्यानंतर अणदूरच्या श्री खंडोबा मंदिरातील दोन्ही घोड्याचे आगमन झाले. यावेळी शोभेचे दारूकाम करण्यात आले.त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता मंदिर ट्रस्टच्या वतीने अणदूर व नळदुर्ग मानक-यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर पहाटे तीन वाजता छबिन्यास प्रारंभ झाला. समोर दोन घोडे, पालखी आणि गावागावांतून आलेल्या काठ्या समवेत नदीकाळावरील मसोबा , जुने मंदिर मार्गे वाजत - गाजत छबिना काढण्यात आला.हलगीच्या तालावर नाचणारे वारू, विविद्य वाद्यात येळकोट, येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत श्री खंडोबाचा छबिना सकाळच्या सहा वाजण्याच्या सुमारास पार पडला.
यात्रा शांततेत पार पडण्यासाठी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व पुजारी मंडळाने सलग तीन दिवस परिश्रम घेतले.तसेच नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम केले.पोलीस निरीक्षक शेटगार यांनी सलग तीन दिवस जागे राहून काम केल्याने यात्रा शांततेत पार पडली.पोलीसासाठी श्री खंडोबा देवस्थानने जेवण्याची व राहण्याची व्यवस्था करून जिव्हाळा जपला.

मैलारपूर श्री खंडोबाची यात्रा 2012







मैलारपूर श्री खंडोबाची यात्रा 2012









अणदूर खंडोबा यात्रा सन 2011

अणदूरचा श्री खंडोबा पावने दोन महिन्याच्या वास्तव्यासाठी मैलारपूर (नळदुर्ग)कडे जात असताना निघालेली पालखी...

अणदूर खंडोबा यात्रा सन 2011

अणदूरचा श्री खंडोबा...येळकोट, येळकोट, जय मल्हार....
अणदूरचा श्री खंडोबा...येळकोट, येळकोट, जय मल्हार....